Wednesday, May 13

Action against electricity ; माकपच्या आंदोलनाच्या दबावानंतर वीज वितरण कंपनीवर कारवाई

नांदेड। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) निवेदनानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अनियमित कारभाराची गंभीर दखल घेतली आहे.

वीजपुरवठ्यातील वारंवार खंड,अधिकारी – कर्मचारी यांच्या मार्फत ग्राहकांना व सामान्य नागरिकांना प्रतिसाद न देणे, मोबाईल फोन बंद करून ठेवणे किंवा फोन न घेणे,अवाजवी बिलिंग, सतत होत असलेली वीज खंडित समस्या आणि ग्राहक तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत माकपचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दि.९ मे रोजी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. १० मे रोजी जिल्हाधिकारी यांनी आपल्या कक्षात महावितरणची आढावा बैठक घेतली.

माकपच्या तालुका समितीने गेल्या आठवड्यात माध्यमातून निवेदन सादर करून नांदेड शहर आणि ग्रामीण भागातील वीज समस्यांवर त्वरित कारवाईची मागणी केली होती. शहरामध्ये तासन्तास वीजपुरवठा खंडित होतो, जादा बिले येत आहेत. वीज कंपनीचा ढिसाळ कारभार सहन केला जाणार नाही, वीज वितरण कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करणार असे माकपचे कॉ.गायकवाड यांनी सांगितले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदनाची तातडीने दखल घेत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तसेच वीजपुरवठ्याच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली.

स्थानिक नागरिकांनी माकपच्या पुढाकाराचे स्वागत केले असून, वीज समस्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांमध्ये संताप आहे. रोज वीज जाते, बिल मात्र दुप्पट येते. आता कामचुकार अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाईची गरज आहे,असे नांदेडमधील रहिवासी बोलून दाखवत आहेत.

वीज कंपनीने दिलेली प्रतिक्रिया ही पटण्यासारखी नसून उन्हाच्या उकड्यात परेशान असलेल्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.
वीज कंपनीच्या सूत्रांनुसार, कंपनी तांत्रिक अडचणी आणि देखभाल कार्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वीज कंपनीच्या सर्वच जबाबदार अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन गंभीर सूचना केल्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने व्यक्त केली आहे.

पुढील आठ दिवसात सुधारणा झाली नाही तर वीज वितरण कंपनीच्या कामचुकार आणि दोषीं अधिकारी – कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा लेखी इशारा कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!