किनवट, परमेश्वर पेशवे| 31 ऑगस्ट पासून किनवट माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असून या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले तर वादळी वाऱ्यात अनेकांच्या घरांची पडझड होऊन गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट शेतकरी व बेगर झालेल्या कुटुंबांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशा मागणीचे निवेदन आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी किनवट व माहूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील चोवीस तासात 180 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन कापूस सोयाबीन ज्वारी तूर मूग उडीद अशा उभ्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. नदी व नाल्याकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरून पिकासह जमिनी खरडून गेल्या आहेत तर काही ठिकाणी पशुधन दगावले आहेत. सुसाट वारा व पावसामुळे उभी पिके आडवी झाली असून शेतजमिनी पाण्याखाली आल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वादळी पावसात अनेकांच्या घरांची पडझड होऊन गोरगरीब कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. या नुकसानीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करून सरसकट शेतकरी व बेघर झालेल्या कुटुंबाना शासनाने तातडीने सानुगृह अनुदान मंजूर करावे अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
किनवट माहूर तालुक्यावर जेव्हा जेंव्हा नैसर्गिक संकट ओढवते तेव्हा तेव्हा सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकरी व बेघर कुटुंबीयांना अर्थसहाय मंजूर केले जाते. आपत्तीकाळात परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिल्या आहेत. शेतकरी व नागरिकांनी हताश होऊ नये तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना शासनाचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे आश्वासन आमदार भीमराव केराम यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.