नांदेड| बंजारा समाजातील लढवय्ये युवा नेतृत्व व हजारो युवकांचे प्रेरणास्थान असलेले गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण दिगंबर चव्हाण यांनी रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी हजारो कार्यकर्त्यांसह नांदेड येथील सभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी अरुण चव्हाण यांचा पक्षप्रवेश जाहीर केला.
यावेळी मंचावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,माजी आरोग्यमंत्री अमित देशमुख, माजी सहकार मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील , प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, माजी मंत्री नसीमखान,कुनालजी राऊत,नांदेड जिल्हयाचे प्रभारी अमितजी पटेल,आ.धिरजभैया देशमूख, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण,लातूरचे खा.डॉ.शिवाजीराव काळगे, जालन्याचे खा.डॉ.कल्याणराव काळे,मा.आ.ईश्वरराव भोसीकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे,आ.प्रज्ञाताई सातव, माधवराव पाटील उपस्थित होते.
यावेळी अरुणभाऊ चव्हाण यांचे मोठ्या उत्साहात जाहीर स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत “विजयी भव:”चा आशीर्वादरुपी नारा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पक्ष प्रवेशाबद्दल प्रतिक्रिया देतांना,अरुण चव्हाण म्हणाले की,नव्या पिढीतील युवकांना काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, भूमिका यांची अधिक प्रभावीपणे ओळख करून देऊ.तसेच काँग्रेस संघटनेच्या माध्यमातून पक्षाचे सर्व ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून करु असे सांगत,धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आधारे संपूर्ण देशाच्या विकासाचा आराखडा घेऊन काँग्रेस सरकारने आजतागायत कार्य केलेलं आहे असा महत्वाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
त्यामुळे काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरणे तसेच पक्षाचे विकासाचे धोरण तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगत,पक्षानी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला उमेदवारी देऊन काम करण्याची संधी दिल्यास आपण नक्कीच ताकदीने प्रयत्न करू अशी भावना यावेळी अरुण चव्हाण यांनी व्यक्त केली. यावेळी काँग्रेसचे व गोर बंजारा सेनेचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.