सहा डिसेंबर हा दिवस म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या निर्वाणाचा दिवस. चळवळीचं अखिल निर्वाण मांडणारा दिवस. निर्वाण म्हणजे संपणे नव्हे. मृत्यू तर नव्हेच नव्हे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. म्हणजे बाबासाहेब आम्हाला कायमचे सोडून गेले असा अर्थ घेऊन आम्ही तो अत्यंत दुःखाचा दिवस म्हणून कँडल मार्च काढून, रक्तदान करुन साजरा करतो. हे करु नये हा काही मुद्दा नाही. बाबासाहेब नावाचा महामानव सुख दुःखाच्या पार पार पलिकडे पोहोचलेला असतो. म्हणजे ते सगळे काही संवेदनाहीन असते असे नव्हे. तर ते आंबेडकरी जगण्याचंच निर्वाण मांडत असतं. धम्म चळवळीचं निळं क्षितीज तुमच्यासमोर कलंडवून ठेवतं. अकुशल कर्मापासून किंवा तत्सम घटकांपासून ते मुक्ती देणारं ठरतं.
ही मुक्ती आंबेडकरी विचार, भूमिका, दिशा आणि तुमचं कार्यकर्तृत्व ते ठरवत असते. म्हणून तो दुःखाचा दिवस नाही. तो रुदनाचाही दिवस नाही. तसेच तो तसा साजरा करण्याचाही दिवस नाही. तुमच्या सहभागाचा, योगदानाचा आणि आंबेडकरी चळवळीच्या नूतनीकरणाचा तो दिवस आहे. माझा नवा जन्म होतो आहे, हे सांगणारा दिवस आहे. हे सगळे कसे निक्षून निक्षून सांगता येईल याचा विचार करणारा दिवस आहे. कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तींसाठी स्वतःच्या जीवनात महासंकल्प निर्माण करणारा हा महापरिनिर्वाण दिवस आहे. अशातच कुणाला तरी वाटलं की बाबासाहेब या दिवशी इहलोक सोडून निघून गेले. म्हणून तो महाप्रयाण दिवस आहे. महापरिनिर्वाण हे केवळ बुद्धासाठीच योग्य ठरते. बोधीसत्व असलेल्या बाबासाहेबांसाठी नाही. महापरिनिर्वाण ऐवजी महाप्रयाण हा शब्दच्छल सुरू झालेला आहे. मग ते नुसतेच प्रयाण का नको? बाबासाहेब बोधीसत्वाच्या कक्षेतही मावत नाहीत. बाबासाहेब ‘महा’ची मर्यादा तोडून बाहेर पडलेले आहेत. बाबासाहेब हेच भारतासाठी महाबुद्ध आहेत. बाबासाहेब हेच आंबेडकरीच नव्हे तर आमच्यासाठी मानवी जगण्याचा सूर्यसिद्धांत आहेत.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जगभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. त्यांचे व्यक्तिमत्त्व जेवढे उत्तुंग होते तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक आंबेडकरी विचार महान, विश्वव्यापी आणि उत्तुंग असा आहे. या आंबेडकरी विचारधारेच्या अनुनयामुळे या देशातील कोट्यावधी दीन, दुबळ्या, शोषित पीडितांचे कल्याण झाले. आजपर्यंतच्या त्यांच्या पिढ्या सुखनैव आयुष्य जगत आहेत. अत्यंत पशुहीन जगणे ज्यांच्या वाट्याला आले होते, त्यांना स्वाभिमानाचे जगणे लाभले. परंतु बाबासाहेबांनी मानवी जगण्याच्या सूर्यसिद्धांत मांडला होता त्याचा सूर या जनतेला सापडलेला नाही. स्वाभिमान गहाण ठेवावा लागण्याची वेळ सतत त्यांच्यावर येत आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अस्पृश्यता गेली असली तरी राजकीय, आर्थिक अशा स्वरूपाची आधुनिक अस्पृश्यता इथल्या राष्ट्रीय समाजात रुजली आहे. त्याकाळी मानवी हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवल्या जात होते.
आजही तुम्हाला विविध माध्यमांतून सर्वतोपरी वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या जाती पूर्वी श्रेष्ठ मानल्या जात होत्या त्या आजही श्रेष्ठच समजल्या जातात. अशी मानसिकता श्रेष्ठ कनिष्ठ सर्वांचीच बनली गेली आहे. राजकीय सत्तेपासून तुम्हाला सतत दूर ठेवण्याचे मनसुबे तयार केले जातात. बाबासाहेबांना कोणत्याच निवडणुकीत निवडून येऊ दिले नाही. त्यांचा पराभव तत्कालीन काँग्रेस आणि कम्युनिस्टांनीच केला आहे. त्यांचे पुत्र सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर हेही निवडणुकीत हरले. त्यांचे चिरंजीव बाळासाहेब आंबेडकर स्वबळावर निवडणूक जिंकू शकले नाहीत. या देशाच्या घटनाकारालाच पराभवाची चव चाखावी लागली आहे. तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही सतत अपयश येत आहे. एवढेच नव्हे तर या चळवळीतील एकही उमेदवार निवडून येत नाही अशी असणारी परिस्थिती सद्या दिसते आहे. तो निवडून यावा. तो कसा निवडून येईल याचा विचार करायला लावणारा हा दिवस आहे.
आंबेडकरी मतांची गरज इथल्या सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना भासते. परंतु ते एकजीवत्वाने आपल्यात सामावून घेण्यासाठी ते तयार नसतात. सर्वच मानवांकडे सम्यकतेने पाहण्याची निसर्गदृष्टी इथल्या राजकीय पक्षांना आणि आजच्या परिस्थितीत स्वतःच्या जातींना श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या त्या जातीच्या अहंकारांना अजूनही आलेली दिसत नाही. या देशाचा घटनाकार कालही अस्पृश्यच होता आणि आजही अस्पृश्यच आहे अशी भावना या स्वतःला श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या पुरुषांना आणि स्त्रियांना जाणवत आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीमध्ये जातींना फार महत्व प्राप्त झालेले आपल्याला दिसते.
राजकारणात जात हा अवयव सतत प्रबळ ठरत असल्याचे आपल्याला सातत्याने दिसून येते. याबरोबरच आजच्या निवडणूका धनदांडग्यांच्या हातातले बाहुले बनल्या आहेत. म्हणूनच राजकारण आणि निवडणुका हे क्षेत्र गोरगरिबांचे नाही ही मानसिकता बनायला वेळ लागला नाही. इथला सर्वसामान्य माणूस मताधिकार बजावण्यापुरता उरला आहे आणि सार्वत्रिकपणे मत विकण्याच्या या राजकीय दलालांच्या षडयंत्राला बळी पडत चालला आहे. यात दोष त्याचाही आहे. हे बाबासाहेबांना कदापिही अपेक्षित नव्हते. त्यांनी तर वंचितांसाठी राज्यकर्त्या जमातीचे स्वप्न पाहिले होते. घडत मात्र उलटेच आहे. दिवसेंदिवस सर्वत्र आंबेडकरी निष्ठा ढासळत असल्याचे आपण पाहतो आहोत. भारतीय संविधान पवित्र मानणारे लोक तेच पायदळी तुडवीत निघाले आहेत. म्हणून दोष त्यांचाही आहे. समाजात स्वाभिमान मिळवण्यासाठी दिले गेलेले रक्तरंजित लढे आता थंडावल्या ने राजकीय गुलामीने आता अधिक सशक्तपणे आपले पाय सर्वत्र रोवणे चालू केले आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजातील राजकीय नेते कार्यकर्ते हे राजकारणातील गुलामी आनंदाने स्विकारायला तयार होतात. हे असेच कित्येक पिढ्यांपासून चालले आहे. हे बदललेच पाहिजे. इथेच परिवर्तनाची खरी गरज लक्षात येते. हे चित्र बदलण्यासाठी तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने समूळ परिवर्तनाच्या लढाईत उतरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हीच महापरिनिर्वाण दिनाची अपेक्षा आहे.
गतकाळात इथल्या समाजव्यवस्थेत अन्याय अत्याचाराची लढाई आंबेडकरी समाजाने लढली आहे. प्रसंगी रक्ताच्या चुंबळी पिळल्या आहेत. स्वाभिमान, सन्मान, आरक्षण यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आंबेडकरी समाज षड्डू ठोकून उभा राहिला आहे. ही या समाजाची कृती जात धर्माच्या पलीकडे जाऊन केलेला आंबेडकरी विचार होता. पण पुढच्या काळात ज्यांच्यासाठी आपण लढतो आहोत त्यांचीही साथ मिळेनाशी झाली. अगदी आजच्या सोशल मिडियाच्या काळातही तरुण पोरांसकट सर्वांना तसे वाटू लागले आहे. एससी मधील इतर जाती, एसटी किंवा ओबीसींच्या संबंधाने आपणच पुढे होऊन नेतृत्व करण्याची गरज नाही. ज्या जातीवर अन्याय झाला त्या जातीने पुढे येऊन लढावे हा विचार पुढे येऊ लागला. तोपर्यंत हरेक जातींच्या किंवा समकक्ष जातसमुहाच्या संघटना बऱ्यापैकी स्थापन झालेल्या होत्या.
पण बहुतांशवेळा ही ताकद कमी पडल्याचे दिसून आले आहे. जी आक्रमकता लढाऊ आंबेडकरी संघटनांमध्ये दिसत होती; ती आता त्यांच्यासह कोणत्याही जातसमुहात दिसत नसल्याने फोडा आणि झोडा इंग्रजी नीती आजचे राज्यकर्ते वापरु लागल्याचे दिसत आहे. विविध जातींमधील धर्मभोळेपणा, हिंदुत्ववाद, कट्टरतावाद या बाबींचा फायदाही राज्यकर्ते उचलताना दिसतात. या सगळ्या गोंधळात परिवर्तनाचा फुले आंबेडकरी विचार मानणारी सर्वच जातसमुहातील बुद्धीवादी पिढी पुढे येऊन आपली भूमिका मांडत आहे, ही एक आशादायक बाब आहे असे म्हणायला हरकत नाही. तेव्हा आंबेडकरी समुहातील बुद्धीवंतांनी त्यांच्यासोबत राहून त्यांना साथ देणे गरजेचेच आहे. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या औचित्याने दरमहा व्याख्यानाचे आयोजन करुन नांदेड शहरात शक्यतो अधिकाधिक जातसमुहांना एका विचारधारेत बांधण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानेही वर्षभर संविधान व्याख्यानमालेचे आयोजन होते आहे. म्हणूनच वैचारिक लढाईसाठी आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काहीएक विचार आपल्या संघर्षशील मेंदूत जन्म घ्यायला हवा.
भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने भारतीय पिछडा शोषित संघटन, लसाकम आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने नांदेड शहरात १२ व्याख्यानांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दरमहा एक भारतीय संविधान संस्कृती, चळवळीचे अभ्यासक नव्या विषयावर व्याख्यान देणार आहेत. भारतीय संविधानाची पंच्याहत्तरी साजरी होत असतांना या वैचारिक मेजवानीची आवश्यकता आहेच अशी संविधानप्रेमींची धारणा आहे. देशभरात संविधानवादाचे धिंडवडे काढले जात असतानाही या बौद्धिक रसग्रहणाची आवश्यकता आहे असे वाटते. भारतीय समाजातील विविध स्तरांमध्ये संविधानविषयी जागरुकता नसल्याचे सातत्याने दिसून येत आहे. या देशात संविधानविरोधी कारवाया होत असताना आपण नेहमी पाहतो. देशभरात संविधानविरोधी लोकांचे जाळे पसरलेले आहे. हे लोक देशातील जनतेला मोठ्या प्रमाणावर संविधानविरोधी बनविण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालेले आहेत. त्यांचे छुपे राजकारण, गुपित षडयंत्र आणि धर्मवादी संविधान व्यवहारात आणण्याचे मनसुबे फळाला जात आहेत. सर्वच संवैधानिक संस्था राजसत्तेच्या बटीक झाल्या आहेत. देशातील सद्यस्थितीचे वर्णन प्रख्यात विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्या शब्दांत ‘पायाखाली सुरुंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे’ असे करता येईल. भारताच्या एकजीव असणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक प्रगतीशील अशा परिस्थितीची वाताहत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. परिस्थिती गंभीर आहे पण आपल्याला या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खंबीर होण्याचा महासंकल्प करावा लागणार आहे.
देशभरात सर्वसामान्यांची आर्थिक, शैक्षणिक तसेच राजकीय कोंडी करुन सार्वत्रिक दौर्बल्य लादल्या जात आहे. हे अनेकांच्या लक्षात येत नाही. सरकारच्या फुकट योजना लाभान्वित करुन घेणारी जनता आजही मूर्खपणाच्या नंदनवनात नांदत आहे. विविध क्षेत्रात नव्या पद्धतीच्या शोषकांच्या संख्येत वाढ होत आहे. दमनाच्या खाली मानवतेचे स्वातंत्र्य वाकवले जात आहे. एवढेच नव्हे तर संविधान आणि त्याचा आशय बदलण्याची भाषा बोलली जात आहे. हे सगळे होत असताना भोळ्याभाबड्या जनतेला काही कळणारच नाही अशीही व्यवस्था करण्यात आली आहे. कारण ही जनता सरकारी योजना लाटण्यात मग्न झालेली आहे. परंतु एक दिवस ही मग्नता भग्नतेत रुपांतरीत होणार आहे. अशाप्रकारे होणाऱ्या वाताहतीचा हात पर्यायाच्या हातात घेऊनच तिचे निर्मूलन शक्य आहे. हा पर्याय उभे करणेही आवश्यक आहे. हे आपण वैचारिक परिवर्तनाच्या माध्यमातून करु शकतो. म्हणूनच नांदेड शहरात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दरमहा एक अशा बारा व्याख्यानांचे आयोजन भारतीय पिछडा शोषित संघटन, लहुजी साळवे कर्मचारी महासंघ, सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. मित्रहो, जगातील अनन्यसाधारण संविधान आपले महान शस्त्र आहे. त्यामुळे सद्विवेकवाद्यांना कोणतेही विषारी पर्यावरण हरवू शकत नाही.
भारतीय संविधानाच्या वैचारिक घुसळणीतून संविधाननिष्ठ कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अखंड चळवळीची अपेक्षा व्यक्त करणे गैर नाही. सत्य हे संविधानाचे सौंदर्य आहे. त्यामुळे असंविधानिक अशा असत्या विरोधात सत्य मांडण्याच्या अग्निपरीक्षेचा हा काळ आहे. त्यामुळे या परीक्षेत उत्तीर्ण होऊनच संविधानविजयाची पताका भारताच्या प्रबुद्ध शिखरांवर फडकवत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू या. यासाठी आपणा सर्वांच्या सहभागाची आणि सहकार्याची आवश्यकता आहे. आपण सर्वांनीच हे वैचारिक आंदोलन यशस्वी करावं असे आवाहन यानिमित्ताने या माध्यमातून करतो आणि थांबतो, धन्यवाद…!
लेखक – प्रज्ञाधर ढवळे, नांदेड. मो. ९८९०२४७९५३