नांदेड | महाराणा प्रतापसिंहजी राजपूत क्षत्रिय समाज समिती, नांदेड यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राजपूत क्षत्रिय संघ आणि “राणा ग्रुप” यांच्या संयुक्त सहकार्याने रविवारी (दि. २१ डिसेंबर) राज्यस्तरीय वधू–वर परिचय संमेलन ओम गार्डन, कौठा (नांदेड) येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात तब्बल ५०७ तरुण–तरुणींनी सहभाग नोंदवत सामाजिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला.


हे संमेलन स्वर्गीय देवीसिंह कुँवरसिंह चौहान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार बालाजीराव कल्याणकर व आमदार आनंदराव बोंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष दिलीपसिंह हजारी होते. व्यासपीठावर लातूरचे माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह ठाकूर, पृथ्वीसिंह बायस व शरदसिंह चौधरी उपस्थित होते.

प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. संयोजक अमरसिंह चौहान यांनी प्रास्ताविकातून समाजातील तरुण पिढीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे व विवाह विषयक संवाद सुलभ करणे हा संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी वधू–वर परिचय संमेलने ही केवळ विवाहापुरती मर्यादित न राहता सामाजिक समन्वय व विश्वास वृद्धिंगत करणारी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.


आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी राजपूत समाजाची गौरवशाली परंपरा, शौर्य व देशसेवेतील योगदान अधोरेखित केले, तर आमदार आनंदराव बोंडारकर यांनी समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांसाठी सातत्याने सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्ष दिलीपसिंह हजारी यांनी राज्यभर राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक उपक्रमांची माहिती दिली. सचिव मोहनसिंह तौर यांनी आभार मानले.

परिचय सत्रात ५०७ तरुण–तरुणींनी व्यासपीठावर जाऊन स्वतःचा परिचय दिला. धर्मभूषण ॲड. दिलीपसिंह ठाकूर यांच्या मुद्देसूद व विनोदी निवेदनामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला. प्रत्येक सहभागीला भेटवस्तू देण्यात आली, तर उत्कृष्ट परिचय देणाऱ्या तीन तरुण व तीन तरुणींना आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात आली. परीक्षक म्हणून इंदिरा चौहान व राम चव्हाण यांनी काम पाहिले.

उत्कृष्ट आयोजनाबद्दल अमरसिंह चौहान व प्रभावी संचालनाबद्दल दिलीप ठाकूर यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. “राणा ग्रुप” व “राणी पद्मिनी राजपूत महिला ग्रुप”चा विशेष ड्रेस कोड हे संमेलनाचे आकर्षण ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालासाहेब कच्छवे, प्रकाशसिंह परदेशी, रवींद्रसिंह गौर, विठ्ठलसिंह गहेरवार, रतनसिंह चौहान, देवेंद्रसिंह चंदेल, संजयसिंह अवस्थी, रघुवीरसिंह हजारी, गंगासिंह ठाकूर, आनंदसिंह चंदेल, बाबूसिंह चौहान, विजयसिंह चौहान, किशनसिंह चंदेल, संजयसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, शैलेंद्रसिंह चौहान, अर्जुनसिंह ठाकूर आदींनी परिश्रम घेतले.
महाराणा प्रताप यांची छबी असलेली रांगोळी, राणी पद्मिनी ग्रुपतर्फे औक्षण, उत्कृष्ट ध्वनी व व्हिडिओ स्क्रीन व्यवस्था, रुचकर भोजन आणि भरगच्च सभागृह यामुळे हे संमेलन सर्वार्थाने संस्मरणीय ठरले.

