हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्याने महावितरणचे शेकडो विद्दुत खांब जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे. हि बाब लक्षात घेऊन हिमायतनगर येथे नुकतेच रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता एन. डी. लोने यांनी तातडीने सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व सर्व लाईनमन कर्मचाऱ्यांना आदेशित केले असून, जमिनीवर पडलेले खांब उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. आत्तापर्यंत ५६ हुन अधिक पोल उभे करण्यात आले असून, येत्या दोन दिवसात राहिलेले २२ पोल उभे होऊन वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.


हिमायतनगर शहर व तालुका परिसरात काही दिवसापूर्वी चक्रीवादळ सदृश्य परिस्थितीत पाऊस झाला. त्यामुळे हिमायतनगर महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयांतर्गत असलेल्या हिमायतनगर व किनवट तालुक्यातील ११ केव्हीचे ७८ पोल, एल टि लाईनचे ७ पोल पडल्याने अनेक गावचा आणि शेतीचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तर जलधारा सबस्टेशन ८ दिवसापासून बंद पडले होते. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात अंधारात रात्र काढावी लागत होती.



महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एन डी लोने याची तातडीने दखल घेतली. आणि कनिष्ठ अभियंता राम चव्हाण, शहरी कनिष्ठ अभियंता बुद्धादीप पाटील, इस्लापूर कनिष्ठ अभियंता श्री जाधव आणि सरसम कनिष्ठ अभियंता श्री लाड, 42 लाईनमान कर्मचारी व सहकारी यांच्यामार्फत पोल उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात शेतकरी व नागरिकांची अडचण दूर होऊन सुरळीत वीज पुरवठा होईल अशी सर्वाना अपेक्षा आहे.


आत्तापर्यंत हिमायतनगर तहसील, खडकी आदींसह अनेक गाव परिसरातील खांब उभे करण्यात आली असून, कोठा तांडा, जलधारा या ठिकाणचे काम युद्ध पातळीवर झाल्याने वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. तर पवना व इतर गावच्या ठिकाणच्या शेतीचे 22 पोलचे काम सुरू असून, दोन ते तीन दिवसांत येथील काम पूर्ण होऊन वीज पुअरवठा सुरळीत होईल. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन उपकार्यकारी अभियंता एन. डी. लोने यांनी केले आहे.


शेतकरी, सर्वसामान्य वीज ग्राहकांनी महावितरण विभागाच्या वसुली प्रतिनिधीला सहकार्य करून सुरळीत वीजपुरवठा मिळविण्यासाठी देयके भरावीत. आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयन्त सुरु आहे. वसुली मोहीम देखील चालविली जात असून, यास चांगला प्रतिसाद मिळत असला तरी थकबाकीदारांनी विलंब न करता वेळेवर देयके भरून सहकार्य करावे असे आवाहन उपकार्यकारी अभियंता एन. डी. लोने यांनी दिली.


