हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र 42 कोटी रुपयांचा निधी खर्च होत असतानाही कामाची गती कासवाप्रमाणे आहे. ठेकेदाराकडून कामात गंभीर अनियमितता, निकृष्ट दर्जाचे साहित्य, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेची पायमल्ली होत आसल्याचे उघडकीस येत असून, ठेकेदाराच्या नाकर्तेपणा बाबत प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या हिमायतनगर रेल्वे प्लॅटफॉर्मवर सिमेंट काँक्रेटचे काम फोडून पुन्हा नव्याने निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. कामामध्ये स्टील कमी जाडीचे वापरले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अंदाजपत्रकातील नियमाला बगल देत ठेकेदार सरळ मलिदा लाटत असल्याची प्रवाशांतून शंका व्यक्त केली जात आहे. जुन्या इमारतीला नव्याने बांधकाम करून “नूतनीकरण” दाखविण्याचा प्रकार सुरू असल्याचे आरोप होत असून, यातून ठेकेदाराची बेजबाबदारी उघडपणे दिसून येत आहे.


एकूणच प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून, प्लॅटफॉर्मवर शेडचे अपूर्ण काम, वीजपुरवठा फक्त 20 मिनिटांसाठी, बॅरिकेट्स व सूचनाफलकांचा अभाव यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळी प्रवाशांना अंधारात रेल्वे पकडावी लागते, अनेक जण लोखंडी रॉड व अडखळून पडून जखमी झाले आहेत. ठेकेदाराचा हा बेजबाबदार कारभार प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा आहे.


हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे काम कोट्यवधी खर्च करूनही दोन वर्षांत का पूर्ण झाले नाही? ठेकेदाराला पाठीशी घालून रेल्वेच्या कामात भ्रष्टाचार तर चालला नाही ना? प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल नागरिकांतुन विचारला जात आहे. नागरिकांची मागणी आहे की, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी, दोषी ठेकेदारावर कारवाई करावी आणि अंदाजपत्रकानुसार गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करावे.


सुविधांची मोठी कमतरता
रेल्वे स्थानकावर सुलभ शौचालय, पार्सल सुविधा नाही. काजीपेठ-मुंबई गाडी गेल्या 3-4 महिन्यांपासून बंद आहे. धनबाद एक्सप्रेसलाही थांबा नाही. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, रेल्वे प्रशासन व ठेकेदारा विरोधात नाराजी व्यक्त होत आहे. हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी अमृत भारत योजनेतून तब्बल “42 कोटींचा निधी खर्च होतोय, पण काम थातूरमातूर पद्धतीने सुरू आहे. जर तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील,” असा इशारा प्रवासी व हिमायतनगर शहरातील विविध संघटनांकडून देण्यात आला आहे.


