नांदेड| शेवडी बाजीराव केंद्रांतर्गत दगडगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नवरात्र उत्सवानिमित्त महिला पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच औचित्याने शाळेच्या माता पालक संघाची बैठकही उत्साहात संपन्न झाली.
यावेळी मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुनेगाव बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सरस्वती अंबलवाड, सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य आणि महिला उपस्थित होत्या. यावेळी स्वच्छतेची प्रतिज्ञाही घेण्यात आली. या निमित्ताने इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गितांचे गायन केले. त्यानंतर माता पालक संघ व इतर माता पालकांचे इयत्ता सहावीच्या वर्गशिक्षिका गंगा नागरगोजे यांनी हळदी कुंकवाने औक्षण केले. या मेळाव्यात मुख्याध्यापक अशोक राऊत यांनी मार्गदर्शन केले.
तसेच सहशिक्षिका गंगा नागरगोजे आणि अनुराधा राऊत यांनी आपल्या मुलींच्या बाबतीत सशक्तीकरण आणि स्वसंरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील उपक्रम शालेय गुणवत्ता, संगणक प्रशिक्षण, प्रयोगशाळा, परसबाग, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा, अक्षरगंगा या स्पर्धा परीक्षांसोबतच विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार भगवान सोनटक्के यांनी मानले.