हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओपन प्रवर्गासाठी जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यावेळी नगराध्यक्ष जनतेतून थेट निवडला जाणार असल्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. आरक्षण जाहीर होताच शहरात तसेच सोशल मीडियावर इच्छुकांचा प्रचार चांगलाच चुरशीचा झाला आहे. हिमायतनगरचा नगराध्यक्ष कोण..? (Who is the mayor of Himayatnagar..?) सोशल मीडियावर इच्छुकांची जोरदार चर्चा होते आहे.


शहरातील फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेटस, इंस्टाग्राम, टेलिग्राम यांसह स्थानिक सोशल प्लॅटफॉर्मवर “भावी नगराध्यक्ष”, “भावी नगरसेवक” अशी ओळख देत शेकडो इच्छुकांनी आपली छायाचित्रे, पोस्टर, बॅनर आणि व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांच्या समर्थकांनी देखील ‘आमचे नगराध्यक्ष’, ‘जनतेचा नेता’, ‘आमचा उमेदवार’ भाऊच अध्यक्ष होणार..? (Discussion of aspirants on social media) अशा घोषणा आणि स्लोगन शेअर करत वातावरण रंगवायला सुरुवात केली आहे. काही जणांनी श्रद्धांजली सारख्या भावनिक पोस्ट तर वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्ट टाकून लक्ष वेधले आहे.


दरम्यान, राजकीय क्षेत्रातून तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेत काही ठोस नावे पुढे येताना दिसत आहेत. ही नावे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर चहाटपऱ्या, बाजारपेठा, हॉटेल चर्चा, नाक्यावरील गप्पा आणि सोशल मीडिया लाईव्ह सेशन्समध्येही चर्चेत आहेत. “यावेळी कोण उभा राहणार?”, “कोणता गट कुणाला पाठिंबा देणार?”, “यावेळी स्थानिक की बाहेरचा चेहरा?” प्रमुख पक्ष युतीत कि अपेक्षा लढणार…? असे प्रश्न नागरिकांतून सतत ऐकायला मिळत आहेत.


नगराध्यक्षपद ओपनसाठी आरक्षित असल्याने वेगळी ऊर्जा मिळाली आहे. काही अनुभवी तसेच काही नवोदित चेहरे आपल्याला संधी मिळू शकते या भावनेने राजकीय संबंध, जातीय समीकरणे, सामाजिक गट आणि संघटनांचे समर्थन मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसते आहे. मागील काळात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष किंवा नगरसेवक अशी मानाची पदे भूषविलेले नेतेदेखील नव्याने रणनीती आखत असून “नशीब आजमावण्याचा” प्रयत्न करत आहेत. काही जण आधीच मोबदला देऊन प्रचारक तयार करताना दिसत आहेत, तर काही जण शांतपणे मांडणी आणि गोटबांधणी करत आहेत.

विशेष म्हणजे, यावेळी थेट जनतेतून अध्यक्ष निवडला जाणार असल्यामुळे प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, वंचित, मनसे, एमआयएम तसेच स्थानिक पॅनल व स्वतंत्र गट आपल्या-आपल्या भावी चेहऱ्यांबाबत आंतरिक स्तरावर चर्चा करत असल्याचे संकेत मिळत आहे. सध्या शहरात एकच प्रश्न घरोघरी, मेळाव्यात, बाजारपेठेत आणि सोशल मीडियावर घोळतो आहे. “हिमायतनगरचा नगराध्यक्ष कोण?” परिस्थिती पाहता येणारे काही दिवस राजकीय गोटबाजी, अंदाज, तर्कवितर्क आणि सोशल मीडिया पोस्टच्या तोफांमुळे अधिकच रंगतदार होणार आहेत.
तर सोशल मीडियावरील पोस्टवर दलाली किंवा गुत्तेदारी करणारा नको, सुशिक्षित आणि वजनदार माणूस हवा, “यावेळचं अध्यक्षपद लोकाभिमुख असलं पाहिजे. फक्त पक्षनिष्ठेपेक्षा काम करणारा चेहरा निवडला गेला तर शहराचं भलं होईल.” “मागील काही काळापासून शहरात पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झालं. सर्वसामान्यांचा आवाज मात्र नेहमी दाबला जातो आहे. नवीन नगराध्यक्ष निवडताना विकास, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या मुद्द्यांवर निर्णय होणं गरजेचं आहे.” “महिला सुरक्षेपासून आरोग्य सुविधा, रस्ते आणि स्वभाव महत्त्वाचं आहे. फक्त नाव मोठं असून उपयोग नाही.” सर्वसामान्यांना घेऊन चालणारा युवा नेता आणि नवीन चेहरा हवा.. जुने कार्यकर्ते विकासाच्या नावाने लुटालूट करतात. हुशार, सुशिक्षित, लोकप्रिय व्यक्ती पदावर हवा .
जण हिताचे व गावाचा सर्वांगीण विकास, धाडसी निर्णय घेऊन गावातली रस्ते, नाल्या, पाणी लाईट आणि सुशोभीकरण करून गावाला एक वेगळ्या दिशेला नेनारा एकही व्यक्ती नाही आहे. नगरध्यक्ष हे पद मोठे आहे पदाला सांभाळणारा आणि लोकहिताचे काम कारणारा व्यक्ती नगरध्यक्ष व्हावा. गावाचा विकास करणाऱ्या माणसाला नगराध्यक्ष करावं गाव विकून खाणाऱ्याला नको. अश्या तिखट प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.


