हिमायतनगर (प्रतिनिधी) तालुक्यातून गोवंशाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी सापळा रचला मात्र पोलीस गाडी दिसताच घारापूर टी-पॉईंटजवळ चोरीच्या संशयित गोवंशांची वाहतूक करणारा बोलेरो पिकअप चालकांच्या घाई गडबडीने उलटल्याने चार गोवंशांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, दि. १० जानेवारी रोजी सकाळी 4 वाजता घडली.


एम.एच. ३७ टी २६५९ क्रमांकाची बोलेरो पिकअप ही गाडी उमरखेडवरून हिमायतनगरमार्गे तेलंगणा राज्यात गोवंशांची बेकायदेशीर वाहतूक करत होती. अंदाजे 16 जनावरांना अतिशय दाटीवाटीने व निर्दयी पद्धतीने कोंबून नेण्यात येत होते. या बाबतची गुप्त माहिती हिमायतनगर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांची गाडी पाहून घारापूर टी-पॉईंटजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली.


या दुर्घटनेत चार गोवंश अपघातात मरण पावले, तर बारा जनावरे किरकोळ जखमी झाली. जिवंत जनावरांना पवना येथील देवकृपा गोशाळेत हलविण्यात आले आहे.


हिमायतनगर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत गाडी व जनावरे ताब्यात घेतली. बोलेरो पिकअप (किंमत अंदाजे ₹५ लाख) तसेच १२ जिवंत व ४ मृत गोवंश (अंदाजे किंमत ₹२.२५ लाख) असा मिळून ₹७.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


पोलीस जमादार विजयकुमार बालाजीराव आदूलवार यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर गजानन हिरामण पुसेगावकर (वय ३९, रा. वाळकी बु., ता. हदगाव) रशिदखान इस्माईलखान पठाण (रा. हस्तरा, ता. हदगाव) अझीम कुरेशी (रा. उमरखेड) या तिघांवर सि.आर. नं. २३७/२०२५ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ज्यात प्राण्यांवरील निर्दयी वागणूक प्रतिबंधक कायदा १९६०, प्राणी संरक्षण अधिनियम तसेच वाहन वाहतूक नियम १९७८ मधील कलमांचा समावेश आहे. तसेच निष्काळजीपणे वाहन चालवून ४ गोवंशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दलही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाे विजयकुमार आदूलवार हे करीत आहेत.


