लोहा | लोहा शहर व कामानिमित्त नगर परिषद कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी आतापर्यंत शुद्ध पिण्याच्या पाण्याची ठोस सुविधा नव्हती. तहानलेले अभ्यागत पाण्यासाठी भटकत असताना प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांत होती. मात्र नगरपालिकेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात नगराध्यक्ष शरद पवार व त्यांच्या टीमने समाजाभिमुख कामांची सुरुवात केली आहे.


नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात १२० लिटर क्षमतेचा वॉटर फिल्टर बसवून ‘जलसेवा’ उपक्रम राबविण्यात आला आहे. या सुविधेमुळे कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांना आता शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.

बँक ऑफ बडोदा यांचे सहकार्य
नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख व टीमने बँक ऑफ बडोदा, लोहा शाखा यांच्याकडे वॉटर फिल्टरची मागणी केली होती. बँकेचे शाखा व्यवस्थापक रविराज गुदमेवाड यांनी तात्काळ प्रतिसाद देत जलसेवेसाठी फिल्टर नगरपालिकेकडे सुपूर्द केला. या प्रसंगी बँक व्यवस्थापक रविराज गुदमेवाड, कृउबा उपसभापती अण्णाराव पवार, नगर परिषद लेखापाल अंजिक्य केंद्रे, बँक कॅशिअर माधव मुकुंदे, तसेच सोपान पवार, संदीप फाजगे आदी उपस्थित होते.


“हक्काचा माणूस सत्तेत” – नागरिकांचा विश्वास दृढ
नगराध्यक्ष शरद पवार यांच्या रूपाने नगरपालिकेत ‘हक्काचा माणूस’ सत्तेत आला आहे, अशी भावना शहरवासीयांत व्यक्त होत आहे. उपनगराध्यक्ष करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, छत्रपती धुतमल, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, गटनेते भास्कर पवार, अविनाश पवार, गणेश बगाडे, सतीश निखाते, केतन खिल्लारे, सदा तेलंग, मारुती जंगले, तुकाराम दाढेल, राजेश बोडके, इरबा पवार, मंजलवाड, पंकज परिहार, नारायण येल्लरवाड यांच्यासह संपूर्ण टीमने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. नगराध्यक्ष शरद पवार म्हणाले, “नगर परिषद कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कामाची दखल घेतली जाईल. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नागरिकांना शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे.”


पाच वर्षांचा अंधार दूर होणार
लोहा शहरातील मुख्य बाजारपेठ व प्रमुख रस्त्यांवरील पाच वर्षांपासूनचा अंधार दूर करण्यासाठी नगराध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नांदेड–लातूर रोडवरील साई लंच होम ते एस्सार पेट्रोल पंप, तसेच गंगाखेड रोडवरील बजरंग यादव यांच्या घरापासून कंधार रोड आश्रमशाळेपर्यंत पथदिवे सुरू करण्याबाबत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. संबंधित ठेकेदारांना तात्काळ पथदिवे सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जलसेवा आणि प्रकाश योजनांसारखे समाजोपयोगी उपक्रम लोहा शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरत आहेत.

