नांदेड| वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने जोमाला कामाला लागावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा निरीक्षक ॲड. सर्वजित बनसोडे यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटन बांधणीचा त्याचबरोबर आगामी विधानसभेची तयारी निमित्ताने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हा दक्षिणच्यावतीने दक्षिण विभागाच्या संपर्क कार्यालयात आज आढावा बैठक संपन्न झाली. तालुका पदाधिकारी व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या यावेळी प्रतिक्रिया घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी काय करावे लागेल यासाठी सूचना व चर्चा करण्यात आली.
यावेळी मंचावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा निरीक्षक ॲड. सर्वजित बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर राज्य प्रवक्ते फारूक अहमद, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, मराठवाडा सदस्य डॉक्टर संघरत्न कुरे, डॉक्टर उत्तम इंगोले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, लोकसभेचे उमेदवार ॲड. अविनाश भोसीकर महासचिव शाम कांबळे, महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष दैवशाला पांचाळ, युवा अध्यक्ष धीरज हाके, समक विद्यार्थी आघाडीचे राजे प्रवक्ते कैलास वाघमारे, महानगर महासचिव अमृत नरंगलकर, मोहम्मद कासिम,शेख बिलाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पक्ष संघटन बांधणीसाठी आणखी ताकद वाढवावी लागेल अशी सर्वांगी चर्चा या बैठकीत झाली.
यावेळी जिल्हा निरीक्षक ॲड. सर्वजित बनसोडे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आता जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता असून आगामी विधानसभेत नांदेड जिल्ह्यातील नऊच्या नऊ जागा लढवितांना दक्षिण विभागात असलेल्या पाच जागांवर मोठी संधी पक्षाला असल्याचे ते म्हणाले. कार्यकर्त्यांच्या एकमेकाविषयी असणाऱ्या छोट्या-मोठ्या वैचारिक वादाचा शेवट करून पक्ष बांधणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. विरोधकांनी वंचित बहुजन आघाडीची धास्ती घेतली असून लोकसभा निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक महाविकास आघाडीने वेळकाढू पणा करीत वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भाने राज्यात विष पेरण्याचे काम केले.
ज्या जागा वंचित बहुजन आघाडीच काय महाविकास आघाडीतील एकही घटक पक्ष जिंकू शकला नाही. त्या दोन-तीन जागा देऊन वंचित बहुजन आघाडीचे खच्चीकरण करायचे असे षडयंत्र महाविकास आघाडीने रचले होते, मात्र ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित पक्षांच्या या या धूर्त राजकारणाला ओळखून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. मताचा टक्का कमी झाला असला तरी लढून हरलो. हा विश्वास आगामी काळात पक्षाला बळ देणारा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खचून न जाता व एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता नव्या जोमाने कामाला लागावे. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी नक्कीच चांगली कामगिरी करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. यावेळी राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनीही मार्गदर्शन केले.
एक ऐक समाजसमूह आता वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभा राहत आहे. थोड्या जास्त प्रमाणात लोकसभा निवडणुकीमध्ये इतर समाजाकडून मतदानाचा टक्का कमी मिळाला असला, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत हा टक्का नक्कीच वाढवून पक्षाला मोठे यश संपादन करून देण्याचा निर्धार यावेळी फारूक अहमद यांनी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनीही आपले विचार मांडले. काम करत असताना काही चुका होत असतात, मात्र कार्यकर्त्यांनी त्या चुकांवर लक्ष केंद्रित न करता त्यात सुधारणा सांगल्यास पक्ष आणखी बळकट होईल. सातत्याने वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता म्हणून वंचित बहुजन आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
या बैठकीला संबोधताना लोकसभेचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे व मतदारांचे जाहीर आभार मानले. अगदी कमी वेळात ही निवडणूक लढवितांना वंचित बहुजन आघाडीने ताकदीने ही निवडणूक लढली परंतु मतदाराने जो कौल दिला आहे. त्याचा सन्मान करीत आगामी काळात आपण पक्षात राहून पूर्णवेळ काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष भीमराव बेंद्रे कर, रवी पंडित, सुरेश गजभारे संघटक रामचंद्र वनंजे, संपर्कप्रमुख देवानंद सरोदे, प्रवक्ता संजय टिके, कोषाध्यक्ष अशोक मगरे, महिला पदाधिकारी संगीता भद्रे तालुकाध्यक्ष विनायक गजभारे, संजय कांबळे, धम्मदीप गावंडे, साहेबराव कोपरेकर, महानगर युवा अध्यक्ष सुकासिंग टाक टाक महासचिव वैभव लष्करे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नागेश वाघमारे आदींची उपस्थिती होती. या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महासचिव श्याम कांबळे यांनी मानले.