बिलोली, गोविंद मुंडकर| पती व पत्नीच्या कौटुंबिक वादाचे रुपांतर भांडणात झाले होते. एका बाळाचा जन्म झाल्यानंतर हा प्रकार झाला.हे प्रकरण बिलोलीच्या दिवाणी वरिष्ठ न्यायालयात प्रविष्ट झाले होते . न्यायालयाच्या सकारात्मक भूमिकेमुळे हे प्रकरण संपुष्टात आले. अखेर पती-पत्नीचे मिलन झाले.


न्यायालयाच्या मध्यस्थीने मुलासह पती पत्नी एकत्र आल्याने या दामंत्यासोबत १० वर्षाच्या मुलाला आनंद झाला. याच बरोबर न्यायालयाच्या परिसरात ही वार्ता समजताच सर्वांच्याच चेह-यावर हास्य दिसत होते.

बिलोली तालुक्यातील बडूर येथिल रामस्वामी गुजरवाड यांची मुलगी यशोदा हिचा विवाह कंधार तालुक्यातील बारुळ येथिल गोविंदराव गालशेटवाड यांचा मुलगा बालाजी यांच्यासोबत दि. ५ में २०१३ साली विवाह झाला होता. लग्नानंतर मुलगा झाला. सुखाचा संसार चालू असताना पती – पत्नीच्या दोघांतील कौटुंबिक वादातून हे प्रकरण सन २०१६ साली बिलोली दिवाणी न्यायालयात आले.

हा खटला जवळपास १० वर्ष न्यायालयात चालला असता. यशोदा ही १० वर्षापासून बडूर येथे माहेरी होती. बालाजी गालसेटवार हा बारुळ येथे राहत होते. या वादात मुलगा वयाने १० वर्षाचा झाला. हा वाद न्यायालयाच्या मध्यस्थीने मिटला. ही घटना दि. ४ मार्च २०२५ रोजी घडली. पती- पत्नीचा मागील संघर्ष व वाद विसरुन एकत्रीत संसार करण्याचा सल्ला दोघांना ही देण्यात आला व सल्ला दोघांनीही आनंदाने मान्य केला.

हा सर्व प्रकार १० वर्षाचा मुलगा आई वडीलांकडे पाहत होता. आई वडील एकत्र आल्याने मुलांच्या चेहेरा आनंदी होता. दुपारच्या सत्रात हा खटला दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अ.अ.का.शेख यांच्या दालनात चालू असताना हा खटला ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी गर्दी झाली होती. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधिश दिनेश ए. कोठलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर .शेख यांच्या मध्यस्थीने मिटविण्यात आला. या कामी ॲड.अनंत बिलोलीकर व ॲड.मनोज आरळीकर यांचीही भूमिका तडजोडीसाठी उपयोगी ठरली . न्यायालय आणि सर्वांच्या सकारात्मक भूमिकेमुळे अखेर पती-पत्नीचे मिलन झाले.