Wednesday, May 13

Bhokar Thift : भोकरमध्ये दुचाकीतील दोन लाख व महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

भोकर| बँकेतून उचललेले पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवून रेनकोट खरेदीसाठी दुकानात गेलेल्या एका कर्मचाऱ्याचे दोन लाख रुपये पळविल्याची घटना ८ जुलै रोजी घडली. तर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी भरदुपारी एका महिलेच्या गळ्यातील गंठण पळविल्याची घटना ५ जुलै रोजी शहरात घडली. आठ दिवसात भरदिवसा चोरीच्या दोन घटना घडल्याने भोकरकर भयभीत झाले आहेत.

हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. येथील लक्ष्मण दत्तराम सूर्यवंशी यांनी भोकर येथील भारतीय स्टेट बँकेतील स्वतः च्या खात्यातून तीन लाख रुपये काढले व बँकेतून निघाल्यानंतर त्यांनी एक लाख रुपये स्वतः जवळ ठेवले. तर दोन लाख रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवून रेनकोट घेण्यासाठी दुकानात गेले. पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेऊन डिक्कीतील दोन लाख रुपये घेऊन पोबारा केला.

याबाबत लक्ष्मण सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र औटे हे करत आहेत. सतत घडणाऱ्या चोरीच्या घटना थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शहरात चोरट्यांनी मांडला उच्छाद
चोरट्यांनी भोकर शहरात उच्छाद मांडला आहे. गेल्या ५ जुलैला येथील मंजुळानगरमधील रूक्मिणी विठ्ठल पदमावार या दुपारी दोन वाजताच्या सुमारास घराकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून पळ काढला. अचानक झालेल्या या घटनेने त्या भयभीत झाल्या. त्यांनी भोकर पोलीस स्थानकात तक्रार दिली. मात्र गुन्हा दाखल झाला किंवा नाही याबाबतची माहिती मिळाली नाही. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!