नांदेड| पोलीस स्टेशन कंधार व उमरी येथे दाखल असलेले घरफोडीचे दोन गुन्हे उघड करून आरोपी उमेश सर्जेराव चव्हाण वय 26 वर्षे व्यवसाय बेकार रा. धानोरा ता. कळमनुरी, जि. हिंगोली यांच्याकडून १,३८,५०६/-रुपयाच्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यांतील गेलामालासह आरोपी निष्पन्न करण्याचे आदेश अधिनस्त सर्व अधिकारी व अंमलदार यांना दिले होते. त्यावरून दिनांक 23.03.2025 रोजी सहा. पोलीस निरीक्षक रवि वाहुळे व त्यांची टिम नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यातील गेलामालासह आरोपीतांचा शोध घेत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी उमेश चव्हाण हा राष्ट्रीय हिन्दी गांधी विद्यालय समोर, हिंगोली गेट, नांदेड येथे चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी येणार आहे.


त्यावरुन पोलीस पथकाने राष्ट्रीय हिन्दी गांधी विद्यालय समोर, हिंगोली गेट, नांदेड येथे सापळा लावुन मिळालेल्या माहिती प्रमाणे एका संशयीत इसमास ताब्यात घेवून त्याची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता, आरोपीचे ताब्यात सोन्याचे दागिने मिळून आले. त्यास त्याचे पुर्ण नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव उमेश सर्जेराव चव्हाण वय 26 वर्षे व्यवसाय बेकार रा. धानोरा ता. कळमनुरी, जि. हिंगोली असे असल्याचे सांगीतले. आरोपीस विश्वासात घेवून त्याचे ताब्यात मिळून आलेल्या सोन्याचे दागिन्या सबंधाने विचारपुस केली असता, त्याने सदर सोन्याचे दागिने कंधार व उमरी परिसरातून घरफोडी करुन चोरी केल्याचे सांगीतले.

आरोपीचे ताब्यात मिळून आलेल्या मुद्देमाला सबंधाने पोलीस स्टेशन अभिलेखाची पाहणी केली असता, सदर चोरी सबंधाने 1) पोलीस स्टेशन कंधार जि. नांदेड गु.र.न. 03/2025 कलम 305,331(3) बी.एन.एस. 2) पोलीस स्टेशन उमरी जि. नांदेड गु.र.न. 09/2025 कलम 331(4),305 बी.एन.एस प्रमाणे दोन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीचे ताब्यातून वरील गुन्ह्यातील सोन्याचे व चांदीचे दागिने किंमत 138506/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने दोन पंचा समक्ष सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर सदर आरोपी यापुर्वी पोलीस स्टेशन नायगाव जि. नांदेड गु.र.न. 140/2019 कलम 457,380 भा.द.वी. व गु.र.न. 155/2019 कलम 457,380 भा.द.वी. मध्ये फरार होता. सदर आरोपीस पुढील कायदेशिर कार्यवाहीकामी पोलीस स्टेशन कंधार येथे ताब्यात देण्यात आले आहे.
