• “सेवा पंधरवाडा” अंतर्गत जिल्हा प्रशासनाचे नाविन्यपूर्ण उपक्रम
• १९ हजार ६३९ कि.मी. रस्ते मोकळे
• ७२ आर जमीन घरकुलधारकांना
• एआय चॅटबॉटद्वारे नागरिकांना विविध सुविधेचा लाभ


नांदेड| “सेवा पंधरवाडा” उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून सर्व उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात आले असून, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक बनविण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर या कालावधीत हा सेवा पंधरवाडा राबविण्यात आला.


टप्पा 1 अंतर्गत रस्ते मोकळे करून नागरिकांना दिलासा
गावरस्ते, शिवारस्ते, शेतरस्ते व पायरस्ते मोकळे करण्याच्या उपक्रमात जिल्ह्यातील एकूण २ हजार १६९ रस्ते मोकळे करण्यात आले असून त्यांची लांबी तब्बल १९ हजार ६३९ कि.मी. आहे. या माध्यमातून १ लाख ५१ हजार ५१९ शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.


टप्पा २ : सर्वांसाठी घरे- घरकुलधारकांना जमीन प्रदान
‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत घरकुलधारकांना घरबांधणीसाठी ७२ आर शासकीय जमीन प्रदान करण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक कुटुंबांना निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


टप्पा ३ अंतर्गत : गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी
जिल्ह्यातील ५२ गावांपैकी २७ गावांना शासकीय गायरान जमिनीसह स्मशानभूमी / दफनभूमीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित गावांसाठी प्रक्रिया सुरू आहे.
सर्व शासकीय जमिनींची माहिती एका क्लिकवर
जिल्ह्यातील सर्व शासकीय जमिनींची माहिती लॅंड बँकच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे. यात एकूण २ हजार ४०८ जमिनींच्या KML फाईल तयार करून GIS प्रणालीवर नकाशावर दर्शविण्यात आल्या आहेत. यामुळे शासकीय जमिनींचे डिजिटल सिमांकन (geo-fencing) झाले असून त्या जमिनींचे संरक्षण व विविध योजनांसाठी जलद वाटप शक्य झाले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नागरिकांसाठी A.I. चॅटबॉट
जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी व्हॉट्सअॅपवर A.I. चॅटबॉट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून विविध योजनांची माहिती, अर्ज नोंदणी आणि ऑनलाईन तक्रारींची सुविधा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. आतापर्यंत ३०८ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
तांड्यांना महसूली गावाचा दर्जा
संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० तांड्यांना महसूली गावांचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
भटक्या व विमुक्त समाजासाठी शिबिर
भटक्या व विमुक्त समाजातील नागरिकांसाठी आयोजित शिबिरांद्वारे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत कार्ड इत्यादी १ हजार ९७५ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच १ हजार ८२३ नागरिकांची नवी मतदार नोंदणी करण्यात आली आहे.
या सर्व उपक्रमांमुळे जिल्ह्यातील महसूल प्रशासनात पारदर्शकता, गतीमानता आणि लोकाभिमुखतेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा प्रशासनाने “सेवा पंधरवाडा”ला खऱ्या अर्थाने जनसेवेचा उत्सव बनवला आहे.


