नांदेड, अनिल मादसवार| पर्यावरण संवर्धन, सामाजिक वनीकरण आणि वनविभागाच्या विविध योजना तसेच मनरेगा योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाते. मात्र या उपक्रमांपैकी अनेक ठिकाणी वृक्षलागवड ही केवळ कागदोपत्री राहते, तर काही ठिकाणी दर्जाहिन, थातूरमातूर काम करून निधीची उधळपट्टी केल्याचे सतत समोर येत आहे. अशाच प्रकारचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाचे नायगाव (खै.) तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांना आला असून त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करीत धक्कादायक अनियमिततेचा भांडाफोड केला आहे.


थातूरमातूर वृक्षलागवड – जागेवर फलकही नाही! नायगाव तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा आणि कॅनाल लगत करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची पाहणी करताना मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा व निकृष्ट काम उघडकीस आले. लावलेली रोपे ठिकठिकाणी वाळलेली, संगोपनाचा कुठलाही मागमूस नाही, सर्वात महत्वाचे म्हणजे कामाचा फलकच नाही, त्यामुळे काम कोणत्या विभागाने केले याचाच पत्ता लागत नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने शासकीय निधीतून कोणते काम केले? त्याचा दर्जा काय? हे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.


कर्तव्यनिष्ठ तहसीलदारांकडून तातडीच्या कारवाईची अपेक्षा – या संदर्भात नायगाव तालुक्याच्या कर्तव्यनिष्ठ तहसीलदार आणि तालुका कार्यकारी दंडाधिकारी धम्मप्रिया गायकवाड यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लवकरच तहसीलदारांना भेटून सविस्तर निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.



पूर्वीही झाले आहेत भांडाफोड आणि कारवाया – सामाजिक वनीकरण, वनविभाग आणि काही ग्रामपंचायतींनी मनरेगा योजनेंतर्गत झालेल्या कागदोपत्री वृक्षलागवड व संगोपनाबाबत यापूर्वीही अनेकदा गंभीर तक्रारी झाल्या आहेत. राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी आणि जेष्ठ पत्रकार लक्ष्मण भवरे यांनी पुराव्यानिशी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे अनेक ठिकाणी दोषींवर कारवाईही झाली आहे.


शासकीय यंत्रणेला सवाल : पर्यावरण की भ्रष्टाचार? एका बाजूला अधिकारी–कर्मचारी प्रामाणिकपणे काम करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडतात, तर दुसरीकडे काहीजण सरकारी सेवेतील पदाचा गैरवापर करून स्वतःचा आर्थिक फायदा साधतात. यामुळे प्रत्यक्षात रोपे जगत नाहीत, पर्यावरण संवर्धनाचा उद्देश फोल ठरतो आणि सरकारी निधीची उधळपट्टी होते.
नायगावातील हा ताजा प्रकार लक्ष वेधून घेत असून, या प्रकरणात पारदर्शक चौकशी व ठोस कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे.

