हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| शहरातील मुख्य रस्त्यावर दररोज वाढणारी वाहतूक आणि वारंवार होणारे ट्रॅफिक जाम यामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच दर्शनासाठी येणारे भाविक प्रचंड त्रस्त झाले आहेत. विशेषतः सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत रस्त्यावरून जाणे ही मोठी कसरत ठरत असून अपघाताचा धोका सुद्धा वाढला आहे.


व्यवस्थित वाहतूक नियंत्रण नसल्याने वाहनचालकांचा संयम सुटत असून रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण होते. स्कूलबस, प्रवासी वाहने, एस टी महामंडळ बस, दोनचाकी-चारचाकी यांची कोंडी दररोज दिसून येत आहे. शहरातील वाढत्या वर्दळीला सक्षम असा वाहतूक नियोजनाचा अभाव जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



या गंभीर समस्येतून दिलासा मिळावा यासाठी नागरिकांकडून मुख्य चौकांवर ट्रॅफिक सिग्नल बसविणे, वाहतूक पोलीसांची स्वतंत्र नियुक्ती करणे, तसेच अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.



अनेक दिवसांपासून तक्रारी होत असतांना कोणतीही ठोस कारवाई न झाल्याबद्दल लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवून ट्रॅफिक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी जनतेतून होत आहे.



