हिंगोली/नांदेड। नांदेड तालुक्यात येणाऱ्या मौजे आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी ट्रॅकरच्या टॉलीत बसून जात असलेला मजुरांचा ट्रॅकर कठडे नसलेल्या विहिरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. ट्रॅक्टर मधील 11 कामगार पैकी तीन कामगाराना बाहेर काढण्यात यश आले. तर 8 जण विहिरीतच अडकले असून, त्यांची शोध मोहीम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केले आहे.


हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथील 10 महिला पुरुष नांदेड जिल्ह्यात असलेल्या आलेगाव शिवारात असलेल्या दगडू शिंदे या शेतकऱ्यांच्या शेतात हळद काढणीच्या कामाला निघाल्या होत्या. सर्व मजुरांना कामाला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर असलेल्या 50 ते 60 फूट खोल असलेल्या विहिरीत ट्रॅक्टर मजुरासह कोसळला. या दुर्घटनेत जिवंत सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्यामध्ये श्रीमती पार्वतीबाई रामा भुरड (वय 35), श्रीमती पुरभाबाई संतोष कांबळे (वय 40), सटवाजी जाधव (वय 55) या शेतमजुरांचा समावेश आहे. तर मृत्तांमध्ये श्रीमती ताराबाई सटवाजी जाधव (वय 35), धुरपता सटवाजी जाधव (वय 18), सिमरण संतोष कांबळे (वय 18), सरस्वती लखन भुरड (वय 25), श्रीमती चऊत्राबाई माधव पारधे (वय 45), श्रीमती सपना/मिना राजु राऊत (वय 25), श्रीमती ज्योती इरबाजी सरोदे (वय 30) या महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावावर शोककळा पसरली आहे.


ट्रॅक्टर अपघातातील अन्य मजुरांचा शोध घेण्यासाठी मोटरपंपच्या साहाय्याने विहिरीतील पाणी उपसा केला जात असून, विहिरीत अडकलेल्या मजुरांना पोलीस प्रशासन व नांदेड वाघाळा मनपाचे शोध व बचाव पथकाचे कर्मचारी, स्थानिक कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने शोध व बचाव कार्य संपन्न झाले. विहीर एवढी खोल असतांना देखील विहिरीभोवतली सुरक्षा कठडे बांधले नसल्याचे दिसुन आले असुन, सुरक्षा कठडे असले असते तर कदाचित ट्रॅक्टर कठड्यावर अडकून हानी टळली असती असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या चर्चेतून समोर येत होते.

मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये अर्थसहाय्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या. त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. 3 महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल अशी घोषणा करणारी पोस्ट फेसबुक वॉलवरून केली आहे.