हिमायतनगर| आदर्श समाज निर्मितीसाठी आजच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकारावे असे आवाहन प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. येथील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंचावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व वीर हुतात्मा जयंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. डी. सी. देशमुख यांनी केले. सदरील कार्यक्रमाच्या मंचावर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी भदरगे हे लाभले होते. प्रमुख उपस्थिती म्हणून समाजशास्त्र विभागाचे प्रमुख व महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. डि. के. कदम सर तसेच नॅक समन्वयक प्रा . डॉ. गजानन दगडे उपस्थित होते.

शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने मंचावरून बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रा. डॉ. भदरगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत असताना विद्यार्थ्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडे आपला आदर्श राजा मॅनेजमेंट गुरु म्हणून पाहावं. आणि अशा जयंती महोत्सवातून शिवरायांच्या तेजस्वी विचार व कार्याचा जागर व्हावा. आणि विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अंगीकार करून आपले जीवन घडवावे ही काळाची गरज आहे. असे ते म्हणाले.


शिव जन्मोत्सव सोहळ्याचे सुत्रसंचलन वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. संघपाल इंगळे यांनी केले तर मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एल. एस. पवार यांनी आभार मांडले. सदरील कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
