हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील मनाठा सर्कल अंतर्गत येणाऱ्या वरवट परिसरात सोमवारी (दि. २७ मे) दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे भीषण घटना घडली. पावसामुळे आलेल्या पूराच्या प्रवाहात एक महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. त्यातील दुर्गा बळवंत शंकरगे (वय ८) हिचा मृतदेह दुपारी सापडला असून, तिची आई अरुणा बळवंत शंकरगे (वय ३७) आणि बहीण समृद्धी विजय शंकरगे (वय १०) यांचा अनेक तासाच्या शोधानंतर सायंकाळी ६ वाजता मृतदेह सापडले.



मिळालेल्या माहिती नुसार, अरुणा शंकरगे दोन मुलींना घेऊन शेतात गेल्या होत्या परतताना पावसाने अचानक जोर धरला. वरवट गावा जवळ ओढ्यावर असलेल्या पुलावरून त्या घरी परतत असताना जोरदार पुराच्या लाटांमुळे तिघीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.या घटनेची माहिती मिळताच हदगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे, नायब तहसिलदार मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांच्यासह बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.



हदगांव नांदेड येथून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून, वरवट ते चिखली फुटाणा चुचा या ओढ्यामध्ये शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.या दुर्घटनेमुळे संपूर्ण वरवट परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून शोधकार्य वेगाने सुरू असून सायंकाळी ६ वाजता दोघीं चे मृतदेह आढळून आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.




