Wednesday, May 13

New Direction :संघाच्या समाजकेंद्री कार्यातून भटक्या-विमुक्तांसाठी नवदिशा” परिसंवादामध्ये मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार

नांदेड l “भटक्या आणि विमुक्त जातींच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक उत्थानासाठी रचनात्मक चळवळी आणि नव्वदोत्तरी मराठी साहित्य यांचा समन्वय आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विविध मान्यवरांनी केले. ‘आधुनिक सामाजिक-राजकीय चळवळी व नव्वदोत्तरी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात त्यांनी आपले विचार मांडले.

या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दत्ता जोशी होते. परिसंवादात काशिनाथ पवार, मृणालिनी नानिवडेकर, आणि आशुतोष अडोणी यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. या कार्यक्रमाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर भाष्य करताना काशिनाथ पवार म्हणाले, “पूर्वी या समाजाची जीवनपद्धती परिघाबाहेरची होती. शिक्षण व संधीपासून तो वंचित राहिल्याने त्यांच्यावर गुन्हेगारीचा ठपका लागला. इंग्रजांनी ‘गुन्हेगार जमाती’ ठरवून संपूर्ण कुटुंबांना तुरुंगात टाकण्याचे कायदे केले. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनात्मक चळवळीमुळे या समाजाचा उत्थानाचा मार्ग खुला झाला आहे. विद्रोहाशिवाय चळवळ होत नाही हा रूढ समज संघाच्या कार्यामुळे बदलला आहे.”

मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या, “1990 च्या दशकातील मंडल आयोगानंतरची आंदोलने ‘मला काय मिळणार’ या दृष्टिकोनातून होती. अस्मितेच्या राजकारणाने समाज भरकटला. आज व्यक्तिकेंद्री आंदोलने होत असली, तरी ती देशविघातक स्तरावर गेलेली नाहीत. मात्र या चळवळी समाजाला काय देतात याचा शोध साहित्यिकांनी घ्यायला हवा. संघाचे कार्यकर्ते जे सामाजिक विचार मांडतात, त्याला समाज स्वीकारतो आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि साहित्यिक यांच्यात वैचारिक घुसळण होणे गरजेचे आहे.”

सामाजिक समरसतेच्या मूल्यांवर भाष्य करताना आशुतोष अडोणी म्हणाले, “सर्वांनी एकाच ताटात जेवावे असे वाटणे म्हणजेच समरसतेचा खरा अर्थ. संघाच्या कार्यातून निर्माण झालेल्या रचनात्मक कृतीमुळे समाजात बंधुभावाचा प्रसार झाला आहे. वैचारिक सृष्टीच्या आकलनासाठी संघाने उभे केलेले सांस्कृतिक कार्य महत्त्वाचे ठरले आहे.”

या परिसंवादाचा समारोप करताना दत्ता जोशी म्हणाले, “रचनात्मक कार्याचे प्रतिबिंब समाजात उमटते. देशाची उभारणी सकारात्मक चळवळींमुळे होत आहे. साहित्यिकांनी ग्रामीण भागातील अनुभवांवर आधारित लेखन करत राष्ट्रीय विचारांना साहित्यिक अधिष्ठान दिले तर ते व्यापक समाजपरिवर्तनाचे साधन ठरू शकते. संघाच्या रचनात्मक कार्यामुळे समाजाच्या मनामनात विश्वास निर्माण झाला आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश अहिरराव यांनी केले. कार्यक्रमाला नांदेड शहरातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!