किनवट, परमेश्वर पेशवे l चंद्रपूर श्री गुरुसाहिब गुरुगादी परंपरेचे तेजस्वी वारसदार आणि सातवे परम सेवाधारी गुरू महंत श्री गुलाबसिंग जी महाराज यांचे आज पहाटे 6.17 वाजता, चंद्रपूर येथील गुरूदरबारात निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण मथुरा-लभाणा समाज आणि भाविक वर्ग शोकमग्न झाला आहे.


स्व. गुलाबसिंग जी महाराज हे केवळ आध्यात्मिक गुरू नव्हते, तर ते समाजसुधारक, द्रष्टे नेते आणि भक्तीमार्गाचे महान प्रणेते होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भक्तिमार्ग, साधना, अध्यात्म आणि लोककल्याणासाठी समर्पित केले. लभाणा समाजात एकतेचा संदेश, बंधुत्वाची शिकवण आणि निस्वार्थ सेवेचा मूलगामी विचार त्यांनी दृढ केला. नव्या पिढीला धर्म, साधना आणि गुरूसेवा या त्रिसूत्रीचा सखोल अर्थ त्यांनी प्रत्यक्ष आचरणातून शिकवला.


महाराजांचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि तेलंगणातील लभाणा समाजावरही त्यांच्या मार्गदर्शनाचा ठसा होता. त्यांनी विविध धार्मिक यात्रांचे नेतृत्व केले, संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार केला आणि ‘समाजासाठी संत’ ही संकल्पना आपल्या आचरणातून साकार केली.


श्री गुलाबसिंग जी महाराज हे श्री गुरुसाहिब गुरुगादी परंपरेतील सातवे सेवाधारी होते. या परंपरेची सुरुवात 18व्या शतकात झाली असून, तिच्या माध्यमातून लभाणा समाजात आध्यात्मिक जागृती आणि सामाजिक उन्नतीचा मार्ग निर्माण झाला. याआधीच्या एकूण चार गुरूंच्या समाधी करंजी-कोसमेट (ता. किनवट, जि. नांदेड) येथे असून, त्याच ठिकाणी, पवित्र ‘थडा’ समाधीस्थळी, स्व. गुलाबसिंग जी महाराज यांची अंत्यक्रिया होणार आहे. हे स्थळ लभाणा भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते.

महाराजांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम 20 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता, करंजी-कोसमेट येथील श्री गुरू महाराज समाधीस्थळी पार पडणार आहे. या अंत्यविधीसाठी श्री गुरुसाहिब दरबार, चंद्रपूर येथून महाराजांची अंतिम यात्रा भक्तिभाव व शिस्तबद्धतेसह निघणार आहे. या यात्रेत हजारो भाविक सहभागी होणार आहेत.
स्व. गुलाबसिंग जी महाराज यांच्या निधनामुळे लभाणा समाजाने एक तेजस्वी आध्यात्मिक दीपस्तंभ गमावला आहे. त्यांनी रोवलेले संस्कार, रुजवलेले मूल्यविचार आणि जागवलेली भक्तीभावना आजही हजारो भक्तांच्या जीवनात प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी समाज एकत्र येत आहेत.
“रग़ रग़ में राम जगाकण, नखऴगो गरु महाराज जोग लगाकण” या श्रद्धावाक्याच्या माध्यमातून त्यांच्या भक्तिमय जीवनाचे स्मरण व गौरव करण्यात येत आहे. स्व. गुलाबसिंग जी महाराज यांच्या निधनाबद्दल अनेक संत, समाजनेते, आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या स्मृतींना चिरंतन ठेवण्यासाठी गुरुगादी सेवा समितीतर्फे विशेष स्मृतीकार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे.


