Santosh Gandhe : राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त संतोष गंधे यांचा सत्कार

IMG 20251008 WA0015 Santosh Gandhe : राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त संतोष गंधे यांचा सत्कार

श्रीक्षेत्र माहूर| माहूर तालुक्यातील मौजे गोंडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बीटस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माहूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सपोनी रमेश जाधवर (सिंदखेड पोलीस स्टेशन) व माजी गटशिक्षणाधिकारी रवींद्र जाधव उपस्थित होते.

या परिषदेमध्ये क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुरु गौरव पुरस्कार २०२५ हा शिक्षण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संतोष शेषराव गंधे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना संतोष गंधे सर यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी गोंडवाडी शाळेच्या शैक्षणिक व भौतिक उन्नतीसाठी दिलेले योगदान, तसेच नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाचा उल्लेख सर्वांनी केला.

विशेष व्याख्याते म्हणून उपस्थित असलेल्या प्रा. तुषार तास्के यांनी आपल्या व्याख्यानात म्हटले की, “सामाजिक बांधिलकी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर व्यक्ती असामान्य कार्य करू शकते.” तर माजी गटशिक्षणाधिकारी आर. आर. जाधव यांनी सांगितले की, “विपरीत परिस्थितीतही उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षकच खऱ्या अर्थाने पुरस्काराचे मानकरी ठरतात.”

अध्यक्षीय भाषणात गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार म्हणाले, “राज्यस्तरीय पुरस्काराचा प्रवास शिक्षकाच्या मेहनतीबरोबरच त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच शक्य होतो.” यावेळी गत दोन वर्षांतील पुरस्कारप्राप्त शिक्षक सुरेंद्र कुडे सर व श्रीमती मीरा परोडवाड मॅडम यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला गोंडवाडी ग्रामस्थांसह करंजी बीटअंतर्गत करंजी, गोंडवडसा, सिंदखेड या केंद्रातील सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते. शाळेचा सुसज्ज व आकर्षक परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

कार्यक्रमानंतर सर्वांना स्वादिष्ट स्वरुची भोजनाचा आस्वाद देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सरपंच भास्कर पुरके, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बावणे, तसेच गोंडवाडी ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गंधे सरांनी, तर आभार प्रदर्शन विजय वाघमारे सरांनी केले. संपूर्ण परिषद खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top