हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहरातील जनतेने सलग दोन वेळा एकहाती सत्ता देऊन काँग्रेसवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्यांची आहे. नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत वार्डा-वार्डात जाऊन काम करण्याचे स्पष्ट निर्देश काँग्रेस नेते व माजी उपनगराध्यक्ष सुनील सोनुले यांनी दिले.


आगामी पालिका निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस शहरातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील सोनुले यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसचा विजय निश्चित असून, “गुलाल आपलाच आहे”, या शब्दांत कार्यकर्त्यां मध्ये नवचैतन्य निर्माण केले.


जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन प्रयत्नशील राहावे, असे ते म्हणाले. या बैठकीत नागरिकांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये –उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा अभाव व रुग्णांची हेळसांडतहसीलकार्यालयातील योजनेचे लाभ वितरणातील दिरंगाई रेशनकार्डातील गोंधळ व नाव नोंदणीच्या समस्या पोलिसांची निष्क्रियता, वाढत्या चोरीच्या घटना, मुलींची छेडछाड व अल्पवयीन मुलांचे वाहतूक नियम उल्लंघन, नगरपालिकेच्या सफाई, लाईट दुरुस्तीतील उदासीनता, अपूर्ण राहिलेले पाणी फिल्टर प्रकल्प,


आंबेडकर चौकातील संविधान प्रतीकेची देखभाल, डास निर्मूलन फवारणीचा अभाव, रमाई योजनेचे अपुरे जनजागरण, झोपडपट्टी व गायरान जमिनीवरील नागरिकांना घरकूल लाभ मिळावा. या सर्व मागण्यांचे निवेदने प्रशासनाला देण्यात आल्याचे सुनील सोनुले यांनी सांगितले. या बैठकीस काँग्रेसचे अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख उपस्थितींमध्ये संदीप शिंदे, खदीरखान, अमित आरसूळ, अहमद पटेल, आनंद कांबळे, विनोद राठोड, फिरोजखान, तसेच अनेक नगरसेवक व कार्यकर्त्यांचा समावेश होता. बैठकीचे सूत्रसंचालन कृष्णा पवार यांनी केले.



