लोकशाही ही केवळ मतदानाच्या यंत्रावर बोट ठेवण्याची प्रक्रिया नाही; ती विवेक, मूल्ये आणि आत्मसन्मान यांची कसोटी असते. अशा काळात, ज्या काळात मत म्हणजे माल आणि मतदार म्हणजे ग्राहक अशी भयावह मानसिकता तयार झाली आहे, त्या काळात डॉ. शिवदास हमंद यांनी घेतलेली भूमिका ही केवळ व्यक्तिगत निर्णय नाही—तो एक नैतिक उठाव आहे.


“मत विकू नये” यावर लेख लिहिणे खरे तर खूप सोपी गोष्ट आहे. वर्तमानपत्रांचे रकाने, व्यासपीठांवरील भाषणे आणि सोशल मीडियावरील पोस्ट्स या विषयाने ओसंडून वाहतात. पण घरी पैसे आलेले असताना ते परत करणे, मोह टाळणे, आणि ‘नाही’ म्हणण्याचे धाडस करणे—ही गोष्ट असामान्य आहे. हे धाडस डॉ. हमंद यांनी केले, म्हणूनच त्यांचा अभिमान वाटतो.

ब्रह्मज्ञान सांगणारे आणि स्वतः कोरडे पाषाण


आपल्या समाजात एक विचित्र विसंगती वाढताना दिसते. इतरांना ब्रह्मज्ञान सांगणारे मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत, पण स्वतः मात्र कोरडे पाषाण बनलेले आहेत. नैतिकतेवर प्रवचनं देणारे, मूल्यांवर व्याख्यानं झोडणारे, आणि समाजसुधारणेच्या गप्पा मारणारे अनेक जण प्रत्यक्ष कृतीच्या वेळी मात्र मौन पाळतात—किंवा सोयीस्करपणे वाकतात.

राजकारणातले राजकारणीच या मोहाचे बळी आहेत असे नाही. समाजातील मतदारही आज मत विकण्यासाठी आतुर झालेला दिसतो. हा मुद्दा स्वीकारायला कठीण असला तरी सत्य आहे. विकणारे तयार असतील तर घेणारे तयार राहणारच—हा व्यवहाराचा क्रूर नियम इथेही लागू होतो.
झोपडपट्टीपुरते मर्यादित असलेले पाप आता सर्वत्र – पूर्वी मत विक्रीचा हा प्रकार ठराविक झोपडपट्टी भागांपुरता मर्यादित होता. पोटाच्या खळगीसाठी, दैनंदिन गरजांसाठी काही टोळ्या सक्रिय होत्या. तेव्हाही ते चुकीचेच होते, पण आजची परिस्थिती अधिक भयावह आहे.
आज मत विक्री ही वर्ग, शिक्षण, आर्थिक स्थिती यांची सीमा ओलांडून सर्वत्र पोहोचली आहे. आज हा व्यवहार अत्यंत व्यवस्थित यंत्रणेत बदलला आहे—पैसे वाटणारे दलाल,संकेत ठरवणारे एजंट, मतदारांची यादी तयार करणारे कार्यकर्ते, आणि मौन पाळणारी यंत्रणा. ही केवळ मतांची खरेदी-विक्री नाही, तर लोकशाहीच्या आत्म्याची तस्करी आहे.
निवडणूक यंत्रणा : ‘बोलाचा भात आणि बोलाचीच कढी’ – निवडणूक नियंत्रण अधिकारी, आचारसंहिता, निरीक्षक—हे सारे कागदोपत्री प्रभावी दिसतात. प्रत्यक्षात मात्र ही सगळी व्यवस्था “बोलाचा भात आणि बोलाचीच कढी” ठरते. कारवाईच्या घोषणा होतात, सूचना दिल्या जातात, पण जमिनीवर चित्र फारसे बदलत नाही. कारण प्रश्न केवळ कायद्याचा नाही, तो नैतिक इच्छाशक्तीचा आहे.
डॉ. हमंद यांचा निर्णय : एक दीपस्तंभ – अशा अंधाऱ्या वातावरणात डॉ. शिवदास हमंद यांचा निर्णय हा दीपस्तंभासारखा आहे. “पैसे परत करणे” ही घटना अनेकांना लहान वाटेल, पण तिचा अर्थ फार मोठा आहे. तो अर्थ असा की— लोकशाही अजून पूर्णपणे मृत नाही. विवेक अजून जिवंत आहे. आणि मूल्यांसाठी उभे राहणारे लोक अजून अस्तित्वात आहेत.
प्रश्न आपल्यालाच आहे – आज प्रश्न राजकारण्यांना नाही, प्रश्न आपल्यालाच आहे – आपण किती किमतीला आपले मत विकतो..? पाचशे, हजार की एखाद्या आश्वासनावर? आणि उद्या त्याच लोकांनी फसवले, तर दोष कुणाचा..? मत विकून आपण फक्त सरकार बदलत नाही; आपण आपला अधिकार, आपला आवाज आणि आपले भविष्य गहाण ठेवतो.
डॉ. शिवदास हमंद यांनी केलेले धाडस हे अपवाद नसून नियम व्हावे, हीच अपेक्षा. मत विक्रीचा गैरव्यवहार बंद झाला पाहिजे—कायद्याने नाही, तर जाणिवेने. कारण लोकशाही वाचवायची असेल, तर मतदाराने आधी स्वतःचा आत्मसन्मान वाचवला पाहिजे. –ल बा.. बंडे, धोडापूरकर.

