नांदेड l राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चंद्रगुप्त नगराचा विजयादशमी उत्सव श्री स्वामी समर्थ केंद्र सिडको येथे संपन्न झाला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत असून स्वाभाविकच त्याचा उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये आहे.


संघाच्या या शंभर वर्षाच्या प्रवासात संपूर्ण हिंदू समाजाचे आणि स्वयंसेवकांच्या परिवाराचे योगदान महत्वपूर्ण राहिले आह. समाजाच्या सहकार्यामुळेच हा शताब्दी प्रवास यथोचित झाला आहे. परंतु संघाचे कार्य अविरत अखंडपणे चालणारे आहे. मातृभूमीला परम वैभवसंपन्न करण्यासाठी सर्वांना सोबत मिळून काम करावे लागणार आहे.


संघाच्या पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन आपल्याला घडवून आणायचे आहे असे वक्तव्य उत्सवाचे प्रमुख वक्ते आशीष सिंह चौधरी यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर नगर कार्यवाह तुकाराम भरत बेस्ते व प्रमुख पाहुणे श्री मोहन घोगरे ( वृक्ष मित्र ) उपस्थित होते. उत्सवाच्या सुरुवातीला चंद्रगुप्त नगरातून संघाचे संघोष पथसंचलन झाले व उत्सवाचा समारोप श्री स्वामी समर्थ सिडको या ठिकाणी झाला.


उत्सवातील प्रमुख वक्ते आशिष सिंह चौधरी म्हणाले, पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली ती भारताला पुन्हा परम वैभवसंपन्न करण्यासाठी. हिंदू समाज आपले स्वत्व विसरल्यामुळे परकीय आक्रमकांनी आपले अतोनात नुकसान केले.

इस्लामिक आक्रमकांनी हिंदू अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटिशांनी येथील पूर्ण समाजात भेद निर्माण करून आपापसात भांडण लावण्याचे कारस्थान रचले. त्यामुळे पुन्हा आपला समाज गुलामगिरीत जाणार नाही आणि परस्परात एकता व समरसता राहील यासाठी संघाने मागील शंभर वर्ष विविध प्रकारे कार्य केले. येणारा काळ अनेक आव्हानांनी भरलेला आहे. त्यासाठी समाजात एकजूट राहणे खूप आवश्यक आहे.
त्यासाठी संघाने सांगितलेली पंच परिवर्तन आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. त्यासाठी आपल्याला कटिबध्द व्हायचे आहे. संघकार्य हे ईश्वरीय कार्य आहे. यामध्ये स्वयंसेकांसोबत त्याचे परिवार, समाजातील सज्जनशक्ती, माता भगिनी अनेकांचे योगदान राहिले आहे, असे ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने गणवेशधारी स्वंयसेवक व नागरिक उपस्थित होते.


