
नांदेड| सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे वंचित बहुजन आघाडीचे राज्यप्रवक्ते फारुख अहमद यांना सदाबहार फाऊंडेशनच्या वतीने यंदाचा कार्यकर्ता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


सदाबहार फाउंडेशन ही मराठवाड्यातील जेष्ठ समाजवादी नेते दिवंगत सदाशिवराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सेवाभावी कार्य करणारी एक स्वयंसेवी संस्था असून मागील चार वर्षापासून सदाबहार फाउंडेशनच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने आणि सचोटीने कार्य करणार्या कार्यकर्त्यांचा गौरव केला जातो. यावर्षीचा या फाउंडेशनचा कार्यकर्ता गौरव पुरस्कार वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांना जाहीर करण्यात आला असल्याचे पत्र सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे, प्रा. आर. ए. मुनेश्वर, प्रा. एस आर. दुल्लेवाड यांनी फारुख अहमद यांना दिले आहे.

अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात अतिशय प्रामाणिक व पुढाकाराने कार्य करणार्या फारूक अहमद यांनी सामाजिक न्यायासाठी अनेक आंदोलने करुन मोर्चे काढली आहेत. शोषित, पीडित व वंचित घटकांच्या कल्याणासाठी त्यांचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नांदेड येथील सदाबहार फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र देऊन 3 मार्च रोजी नांदेड येथील एका विशेष कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी वंचितचे श्याम कांबळे, विठ्ठल गायकवाड, विनायक गजभारे, अमृत नरंगलकर, साहेबराव भंडारे, हरी कसबे, गौतम डुमने आदींची उपस्थिती होती.





