hail and dry garbage | ओला व सुका कचरा विलगीकरण जनजागृतीसाठी नायगाव तालुक्यात ग्रामसेवकांचा पुढाकार -NNL

नांदेड| राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करवाल यांच्या आवाहनानुसार नायगाव तालुक्यात स्वच्छतेचे दोन रंग- ओला हिरवा, सुका निळा या मोहिमेअंतर्गत गाव स्तरावर जनजागृतीसाठी नायगाव तालुक्यात ग्रामसेवकांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात बुधवार दिनांक १० जुलै रोजी पंचायत समितीच्या बळवंतराव चव्हाण सभागृहात गट विकास अधिकारी एल.आर. वाजे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.


या मोहिमे अंतर्गत प्रत्येक गावात ५ संवादकाची निवड करण्यात आली असून हे संवादक प्रत्येकाच्या घरी जावून संदेश द्यावे, असे आवाहन गट विकास अधिकारी वाजे यांनी केले. या मोहिमेत सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छागृही, बचत गटातील महिला व गाव स्तरावरील स्वंयसेवक हे गृहभेटी करून स्वच्छतेचे महत्व सांगणार आहेत.

दिनांक ८ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात ठेवावा. तसेच सुका कचरा निळ्या रंगाच्या डब्यात ठेवण्यासंदर्भात तसेच नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पध्दतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय आणि नियमित वापर आदि बाबत गृहभेटीतून माहिती देण्यात येणार आहेत.



भेटी दरम्यान शासनाच्या गुगललींकव्दारे त्या कुटुंबाची फोटोसह माहिती भरण्याचे आवाहन गट विकास अधिकारी एल.आर. वाजे यांनी केले आहे. त्यानुसार नायगाव तालुक्यातील गावांमधून जनजागृतीला सुरुवात करण्यात आली आहे. या बैठकीला आरोग्य विस्तार अधिकारी महेश मुखेडकर, लेखाधिकारी किशोर दाबडकर, स्वच्छ भारत मिशनचे तालुका गट समन्वयक डी.पी. इंदुरकर, ऑपरेटर राज म्हेत्रे, सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.




