हदगांव, शेख चांदपाशा| भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याण महोत्सव समिती, महाराष्ट्र शासनातर्फे 20 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


या स्पर्धेत राज्यातील 36 जिल्ह्यांमधील सुमारे 1 लाख 5 हजार सरकारी, निमसरकारी आणि खासगी शाळांतील एकूण 1 कोटी 16 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. महावीर स्वामींच्या शाश्वत कल्याणकारी तत्त्वांचे जागतिक महत्त्व समजावून देण्यासाठी या भव्य मेगा इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक जिल्ह्यासाठी रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली होती, तसेच राज्यस्तरीय तीन पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले.

यामध्ये उमरखेड येथील युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी व हदगाव येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक पुरुषोत्तमराव भोजनकर यांची नात कु. शर्वरी प्रज्ञान भोजनकर हिने राज्यस्तरावर तिसरा क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. तिने 1 कोटी 16 लाख विद्यार्थ्यांमधून चमकदार यश संपादन करून 1,11,111/- रुपये रोख रक्कम जिंकलीदि.2 फेब्रुवारी 2025 रोजी राजभवन मुंबई येथील दरबार हॉलमध्ये महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन आणि कौशल्य व उद्योजकता विकास मंत्री श्री. मंगल प्रभातजी लोढा यांच्या हस्ते तिला रोख रक्कम व मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


शर्वरीने आपले यश तिचे आजोबा पुरुषोत्तमराव भोजनकर, थोरला भाऊ पार्थ भोजनकर आणि आत्या रोहिणी साखरकर यांना अर्पण केले आहे. या प्रसंगी 83 वर्षीय भोजनकर सरांनी विद्यार्थ्यांना भगवद्गीतेतील “स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव” या अध्यायाचा संदर्भ देत नेहमी नम्र राहण्याचा सल्ला दिला. “नम्रता हा यशाचा मार्ग आहे, संपत्तीपेक्षा संतती घडवणे महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पालकांना आपल्या मुलांच्या उत्तम संस्कारांसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.कु. शर्वरीला या अद्वितीय यशाबद्दल हदगांव शहरातील व तालुकयातील जनते कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.




