करियरनांदेड

Shivani : वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर भोजूचीवाडीच्या शिवानीने दिला बारावीचा पेपर!

कंधार (सचिन मोरे) घरात दुःखाचे सावट, डोळ्यांत अश्रू आणि मनात वडिलांच्या आठवणींचा वेदनादायी पूर… अशा हृदयद्रावक प्रसंगातही शिक्षणाला प्राधान्य देत एका विद्यार्थिनीने जिद्दीचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. हागदळ-गुगदळ (ता. अहमदपूर) मुळगाव भोजूचीवाडी ता. कंधार येथील कु. शिवानी माधव देवकत्‍ते (वय १७) हिने वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या दीड तासांत बारावीच्या गणित विषयाचा पेपर देऊन सर्वांना भावूक केले.

शिवानीचे वडील माधव भिमराव देवकत्‍ते हे पुणे येथे वाहन चालक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे आकस्मिक निधन झाले. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हागदळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच सकाळी अकरा वाजता जळकोट येथील श्री गुरुदत्त ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीचा गणिताचा पेपर होता.

अंत्यसंस्कार आटोपताच, मनावर दगड ठेवून शिवानीने शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. हागदळ-गुगदळ ते जळकोट हे सुमारे ५० किलोमीटरचे अंतर पार करून ती वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचली आणि पेपर दिला. तिच्यासाठी हा केवळ एक विषयाचा पेपर नव्हता, तर आयुष्याच्या कठीण वळणावर दिलेली धैर्याची परीक्षा होती. शिवानी ही कुटुंबातील मोठी मुलगी आहे.

तिच्या पश्चात एक भाऊ सहावीत शिक्षण घेत आहे, तर दुसरा भाऊ अपंग आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सध्या त्यांना आधाराची नितांत गरज आहे. त्यांचे मूळ गाव कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी आहे. अश्रूंना आवर घालत दिलेला हा गणिताचा पेपर म्हणजे शिवानीने आपल्या वडिलांना वाहिलेली खरी आदरांजली ठरली. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास न सोडणाऱ्या या जिद्दी विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या धैर्याला आणि चिकाटीला खरे अर्थाने सलाम.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button