नांदेडलाइफस्टाइल

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण पंचक्रोशी हळहळून गेली आहे. अल्प आजाराने मुलाचा मृत्यू झाल्याचे दुःख सहन न झाल्याने, वडिलांनीही काही तासांत प्राण सोडल्याची घटना घडली असून, बाप–लेकावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर आली आहे.

सिबदरा गावचे रहिवासी गणेश रामलू ताडेवाड (वय 56) यांचे दि. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी अल्प आजाराने निधन झाले. ग्रामीण भागात मिस्त्री काम करून उदरनिर्वाह करणारे गणेश ताडेवाड हे प्रामाणिक, मनमिळावू व कष्टकरी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

गणेश ताडेवाड यांच्या निधनाची बातमी कळताच नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने दुःख व्यक्त केले. ते सध्या हिमायतनगर येथे वास्तव्यास असल्याने दि. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी बोरगडी रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मात्र, याच घटनेने कुटुंबावर आणखी एक आघात झाला. आपल्या जिवलग मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच ज्येष्ठ नागरिक रामलू इरामलू ताडेवाड (वय 80) यांना जबर धक्का बसला. मंगळवारी सकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास, मुलाच्या मृत्यूचा आघात सहन न झाल्याने त्यांचेही निधन झाले.

एकाच दिवशी मुलगा आणि वडील गमावण्याचे दु:ख ताडेवाड कुटुंबावर कोसळले. हिमायतनगर येथे मुलाचा अंत्यविधी आटोपल्यानंतर, सिबदरा गावात दुपारी 12 वाजता शोकाकुल वातावरणात रामलू ताडेवाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाप–लेकाच्या एकाच दिवशी झालेल्या निधनाने सिबदरा गावासह संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, अंत्यसंस्कारावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. “पोटच्या लेकराच्या मृत्यूचा धक्का बापाला सहन झाला नाही,” अशी भावुक प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही, तर मायेच्या नात्याची आणि बाप–लेकाच्या अतूट प्रेमाची हृदयस्पर्शी कथा ठरली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!