हिमायतनगर, अनिल मादसवार| नुकत्याच पार पडलेल्या हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीन जागांवर विजय मिळवत खाते उघडले आहे. या निकालामुळे हिमायतनगरच्या राजकारणात भाजपला निर्णायक बळ मिळाले आहे.


आजवर हिमायतनगर तालुक्यात भाजप केवळ नावालाच अस्तित्वात होती. मात्र अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर जिल्हा भाजपमय करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांना या निवडणुकीत फळ मिळाले, हे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासाठी डॉ. राजेंद्र वानखेडे यांच्यासह एकूण दहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते, त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली होती.


नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी दर्शना शरद चायल, आशिष सकवान आणि भारत डाके हे तिन्ही उमेदवार मताधिक्याने निवडून आल्याने हिमायतनगर नगरपंचायतमध्ये भाजपने खाते उघडले आहे. या यशामुळे भाजप विरोधी पक्षनेते पदाचा दावेदार ठरला असल्याचे बोलले जात आहे.



राज्यात महायुती असली तरी हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही मित्र पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. या लढतीत भाजपने तीन जागांवर विजय मिळवला, शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झाला. त्यामुळे हिमायतनगर निवडणुकीत भाजप ‘मोठा भाऊ’ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.


एकूणच या निकालामुळे हिमायतनगरमध्ये भाजपला मोठे राजकीय बळ मिळाले असून, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांत भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करेल, असे राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.



