हिमायतनगर, अनिल मादसवार | नांदेड–आदिलाबाद हा राज्यातील महत्त्वाचा महामार्ग असून, हिमायतनगर तालुक्यातील सोनारी ते पोटा या दरम्यान लवकरच टोल आकारणी सुरू होणार आहे. मात्र टोलपूर्वीच या महामार्गाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्ता बांधताना “इतका मजबूत महामार्ग की विमान जरी उतरले तरी काही होणार नाही” अशा दणदणीत वल्गना करण्यात आल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात काही महिन्यांतच अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्याने या दाव्यांची पोलखोल झाली आहे.


महामार्गावर ज्या ठिकाणी रोड क्रॅक झाले आहेत, तेथे तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण रस्ता उखडून नव्याने मजबुतीकरण करणे आवश्यक असताना, संबंधित ठेकेदार केवळ वरवरची मलमपट्टी करत असल्याचे चित्र आहे. भेगा सिमेंटने बुजवून काम उरकले जात असल्याने हा महामार्ग दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहे.

या मार्गावर वारंवार अपघात होत असून, रस्त्यावर पडलेल्या भेगा वाहनचालकांच्या जीवावर उठल्या आहेत. विशेषतः दुचाकीस्वार आणि अवजड वाहनांसाठी हे क्रॅक प्राणघातक ठरत आहेत. तरीसुद्धा महामार्ग प्रशासन व ठेकेदाराकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप श्रीदत्त पाटील सोनारीकर यांच्यासह स्थानिक नागरिक आणि वाहनचालक करत आहेत.टोल आकारणीसाठी रस्ता योग्य आहे का? असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.



टोल सुरू होण्याआधीच जर महामार्गाची अशी अवस्था असेल, तर पुढील काही वर्षांत या रस्त्याचे काय होणार, याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने तातडीने स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, तसेच जिथे रस्ता खराब झाला आहे तिथे संपूर्ण रस्ता नव्याने तयार करावा, अशी जोरदार मागणी हिमायतनगर तालुक्यातून होत आहे.


