हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे पाऊस पडला नसताना देखील शहरातील नाल्या ओव्हवरफ्लो होऊन दुर्गंधीयुक्त घाण पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात येत आहेत. नाल्या तुडुंब भरल्याने दुर्गंधी तयार झालेल्या सेफ्टीक आळ्या घरात घुसत असल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकारामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता वाढली असून, पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई करून रस्त्यावर येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा बंदोबस्त करून नगरपंचायतीने नागरिकांना दिलासा द्यावा.


शहरातील नाल्यातील घाण पाण्याची वाट मोकळी करून द्यावी ज्या ठिकाणी नाल्या ओव्हर फ्लो होत आहेत तेथील नालीची रुंदी व खोली वाढवून पुल तयार करून पुन्हा नाल्या जाम होऊन ओव्हर फ्लो होणार नाहीत. याची काळजी नगरपंचायत स्वच्छता विभागाने घ्यावी अन्यथा नगरपंचायतीच्या नाकर्तेपणा विरोधात आंदोलन करण्यात येईल. असा इशारा वार्ड क्रमांक 11 व 12 मधील नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण डांगे यांनी दिला आहे.
