नांदेड। प्रतिकूल वातावरणातसुद्धा सकारात्मक राहून अनुकूलता निर्माण करून भविष्यवेधी शिक्षण देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.
वाजेगाव (ता. नांदेड)ची ऑगस्ट महिन्याची पहिली केंद्रीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे दि. १४ ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. विविध उपक्रम आणि गुणवत्ता वर्धन यांत अग्रेसर असणाऱ्या अक्षर परिवारात सामाजिक बांधिलकी जपून संपूर्ण जगासमोर वेगळा आदर्श निर्माण करणारे आदर्श कुटुंब म्हणजे ढोके कुटुंब असेही व्यंकटेश चौधरी यांनी मत व्यक्त केले.
संवेदनशील अक्षर परिवाराने स्वर्गीय अभिजीत ढोके असिस्टंट मॅनेजर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा माळाकोळी यांच्या दुर्दैवी अपघातानंतर ब्रेन डेड अवस्थेत असतांना अवयवदान करण्याचा संकल्प करून हृदय, फुफुस, किडनी, यकृत, डोळे या अवयवांचे दान करून सहा जणांना जीवदान दिले. पहाडासारख्या दुःखावर मात करून इतरांना जीवदान देण्याचा निर्णय अंमलात आणणारे त्यांचे बंधू नागापूर शाळेचे मुख्याध्यापक अक्षय ढोके यांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्वर्गीय अभिजीत ढोके यांना श्रद्धाजंली अपर्ण करण्यात आली. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी करताना गुणवत्ता विकास महाअभियान, माझी शाळा सुंदर शाळा अभियान यावर आढावा घेतला व शिक्षण परिषदेचा उद्देश स्पष्ट केला.
सुलभक अक्षय ढोके यांनी अध्ययन अध्यापन प्रक्रिया व्यवस्थापन आणि वेध यावर सखोल मार्गदर्शन केले. स्वतःचे अध्ययन अनुभव सांगितले. वेध प्रणाली ही आनंद देणारी शिक्षण प्रणाली आहे. पारंपरिक शिकवण्याची पद्धत आता कालबाह्य झाली असून वेध प्रणालीमुळे विद्यार्थी स्वतः शिकत आहेत. त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पुरक शिक्षण पद्धती म्हणजे वेध शिक्षण होय.
सुलभक सारंग स्वामी यांनी विद्याप्रवेश, पाठयपुस्तकातील पानांचा प्रभावी वापर, रामेश्वर आळंदे यांनी पॅट परीक्षा गुणदान यावर मार्गदर्शन केले. सुलभक सौ. रूपाली गोजवडकर यांनी ग्रंथालय पुस्तक निर्मिती, गुणवत्ता विकास महाभियान, शैक्षणिक स्वास्थ पत्रिका, निपुण भारत या सर्व विषयांची प्रभावीपणे मांडणी केली.
सुलभक रामेश्वर आळंदे यांनी विद्यार्थी गुणवत्तावृद्धी करण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ता निपुण व्हावा. यासाठी सर्व शिक्षकांनी शैक्षणिक साहित्याचा उपयोग करुन विविध उपक्रम राबवुन ASER, NAS, PGI, PISSA नुसार विशेष तयारी करुन केंद्राची गुणवता उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आव्हान याप्रसंगी करण्यात आले. परिषदेचे सूत्रसंचालन सौ. सीमा देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रभारी मुख्याध्यापिका अख्तर बेगम तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.