नांदेड| महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अभ्यासू व ज्येष्ठ सहकारी डॉ. पुंजाराव घनःश्यामराव कल्याणकर यांचे आज वृद्धापकाळाने नांदेड येथे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. महासंघाचे संस्थापक तथा मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांनी डॉ. पुंजाराव कल्याणकर यांच्या दुःखद निधनामुळे तीव्र शोक व्यक्त केला आहे. दिवंगत डॉ. पुंजाराव कल्याणकर यांच्या निधनाने महासंघाने एक सच्चा सहकारी व कुशल संघटक गमावला आहे. संपूर्ण अधिकारी महासंघ व संलग्न संघटना या दुःखद प्रसंगी कल्याणकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहेत.


दिवंगत डॉ. कल्याणकर हे महासंघाचे कुशल संघटक व लोकप्रिय वैद्यकीय अधिकारी होते. त्यांच्या संघटनपूर्ण कौशल्यामुळे त्यांनी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची संघटना (मॅग्मो) साठी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यात यश प्राप्त झाले.


दिवंगत डॉ. कल्याणकर यांनी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो संघटनेला शासनमान्यता प्राप्त करुन ऊर्जितावस्था आणली. वर्ष १९९१ ते १९९८ या कालावधीत त्यांनी मॅग्मो संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पतपेढी आणि गृहनिर्माण संस्था स्थापन केली.

वर्ष १९९९ मध्ये त्यांनी शासन-प्रशासनासमवेत चर्चेमध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करुन, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी वर्ग-१ पद निर्माण करण्यात यश मिळविले तसेच, त्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. वर्ष १९९९ ते २००२ म्हणजे निवृत्त होईपर्यंत डॉ. पुंजाराव कल्याणकर हे नांदेड येथे क्षयरोग अधिकारी म्हणून कार्यरत होते.

एक कुशल प्रशासक म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिवंगत डॉ. पुंजाराव कल्याणकर यांनी सर्वसामान्य लोकहितासाठी कार्य करण्यासाठी त्यांच्या मुलाने भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावे, अशी त्यांनी मनिषा व्यक्त केली होती. त्यांचे कर्तबगार चिरंजीव डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी २००७ मध्ये भारतीय प्रशासकीय अधिकारी होऊन त्यांची सदर इच्छा पूर्ण केली.
डॉ. महेंद्र कल्याणकर यांना दोन वेळा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले असून, कोकण विभागीय आयुक्त म्हणून त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. आपल्या कर्तव्यदक्ष मुलाच्या प्रशासकीय यशाबद्दल तसेच सर्वसामान्यांसाठी करीत असलेल्या निःस्पृह सेवेबद्दल डॉ. पुंजाराव कल्याणकर अत्यंत समाधानी होते.