किनवट/नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मौजे पिंपरी येथील शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक वृद्ध शेतकरी गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना मंगळवार दि. 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


मौजे पिंपरी येथील शेतकरी व्यंकटराव नागोराव चाटे (वय 70) हे दिवसभर शेतात काम करून बैलगाडीसह घरी परतत असताना, जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या बैलावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे बैल बिथरला आणि बैलगाडी पलटी झाली. या अपघातात व्यंकटराव चाटे गंभीर जखमी झाले असून बैलही जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ जखमी शेतकऱ्याला उपजिल्हा रुग्णालय, किनवट येथे दाखल केले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद (तेलंगणा) येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.



किनवट तालुका मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असून येथे बिबटे, अस्वले, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र वन्यप्राण्यांचा सतत वावर आहे. पाळीव जनावरांवर तसेच माणसांवर होणारे हल्ले वारंवार घडत असतानाही वनविभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.

या घटनेनंतर शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून बाधित शेतकऱ्यास आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

