HomeनांदेडMp Ashok Chavhan : महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करा! खा. अशोकराव चव्हाण...

Mp Ashok Chavhan : महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करा! खा. अशोकराव चव्हाण यांची शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत मोठी मागणी

नांदेड l शेतकऱ्यांच्या हितासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही भावांतर योजना लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज राज्यसभेत केली. केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, विद्यमान केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना सुरू केली होती. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणांमुळे बाजारात शेतीमालाचे दर कोसळल्यास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान समर्थन मूल्य आणि बाजारभाव यांतील फरकाची रक्कम थेट दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे शक्य होते. ही योजना देशभर तसेच महाराष्ट्रात राबविण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्रासाठी, विशेषतः रेल्वे विकासासाठी, अभूतपूर्व ठरणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. जगात जे उत्तम आहे ते भारतात आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असल्याचे सांगून अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या मुंबई- पुणे आणि पुणे- हैद्राबाद हाय- स्पीड रेल्वे प्रकल्पांचे त्यांनी स्वागत केले. मराठवाड्याच्या रेल्वे विकासाशी संबंधित अनेक मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या. विदर्भ आणि मराठवाडा यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या निर्माणाधीन वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वेमार्गासाठी अधिक निधी उपलब्ध करून हा प्रकल्प कालबद्ध आराखड्यानुसार पूर्ण करावा, अशी मागणी त्यांनी केली.

कर्नाटक सरकारकडून प्रकल्प खर्चातील हिस्सा मंजूर न झाल्यामुळे नांदेड- बिदर रेल्वेमार्ग रखडला असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पास केंद्र सरकारने मान्यता दिली असून महाराष्ट्र सरकारनेही आपल्या खर्चाच्या वाट्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील सर्वपक्षीय खासदारांनी तेथील राज्य सरकारकडे नांदेड- बिदर प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नांदेड- लातूर या सुमारे १०० किलोमीटर लांबीच्या थेट नवीन रेल्वेमार्गास मंजुरी देण्याची मागणीही त्यांनी पुनरुच्चारित केली.

केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान त्यांनी नांदेड- पुणे वंदे भारत एक्सप्रेस, नांदेड- छत्रपती संभाजीनगर- मनमाड- कल्याण- वसई- सुरत- अहमदाबाद डेली सुपरफास्ट एक्सप्रेस, नांदेड- हिंगोली- अकोला- नागपूर- नवी दिल्ली- अमृतसर वंदे भारत स्लीपर ट्रेन तसेच नांदेड- हिंगोली- अकोला- भुसावळ- मुंबई डेली सुपरफास्ट एक्सप्रेस या चार नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी देखील केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताच्या वेगवान प्रगतीचा, विकासाप्रती असलेल्या कटिबद्धतेचा आणि ‘विकसित भारत’ या ध्येयाचा स्पष्ट रोडमॅप मांडणारा असल्याचे त्यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवणारा असून महिला, शेतकरी, उद्योजक, गरीब, वंचित आणि समाजातील सर्व घटकांना बळ देणारा आहे, असेही खा. अशोकराव चव्हाण यांनी नमूद केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments