कंधार,सचिन मोरे| नांदेड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या कंधार तालुक्यातील नागबर्डी येथे दरवर्षी नागपंचमी सणानिमित्त भव्य अशी यात्रा भरत असते. या यात्रेमध्ये नांदेड जिल्ह्यातील हजारो भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी गर्दी करतात. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील ही यात्रा संपन्न होणार असून १७ ऑगस्ट २०२६ रोज सोमवारी लालकंधारी जनावराचे भव्य प्रदर्शन व खुल्या कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधिमंडळ उपविधान समितीचे प्रमुख तथा कंधार-लोहा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे राहणार असून, त्यांच्या हस्ते पशुप्रदर्शन व कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आनंदराव बोंढारकर, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, सुभाषराव साबणे, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रणिताताई देवरे, कंधारचे उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


या यात्रेतील पशुप्रदर्शनात विविध गट पाडण्यात आलेले आहेत.त्यात लालकंधारी जनावरांच्या वासरू गट, कालवड गट, गाय गट, अदाल वळू, दातीचा वळू तसेच प्रथम वर्षाखालील जनावरांचा समावेश राहणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या जनावरास ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकास १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.




दरम्यान, खुल्या कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघास २५ हजार रुपये, उपविजेत्या संघास १५ हजार रुपये, तृतीय क्रमांकाच्या संघास ९ हजार रुपये, तर चौथ्या क्रमांकाच्या संघास ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. कबड्डी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांसाठी ३०१ रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. कबड्डी स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्यासाठी देविदास शिंदे (मो. ९५४५३४४५६१) किंवा अशोक शिंदे (मो. ९६९९१७६९९१) यांच्याशी संपर्क साधावा. पशुप्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पशुमालकांनी आनंदराव शिंदे (मो. ७३५०३७९९३५) किंवा मारोती पाटील सूर्यवंशी (मो. ८९९४४९०३१) यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी.
नावनोंदणी केल्याशिवाय पशुप्रदर्शन व कबड्डी स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या भव्य यात्रा महोत्सवाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर तसेच परिसरातील गावातील सरपंच व गुंडा, बिंडा व दिंडा येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे

