श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मात्र, या शिबिराच्या उद्घाटनावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची वाट न बघता आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आल्याने शिवसेना संतप्त झाली.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी कार्यक्रमात गोंधळ घालत उद्घाटन सोहळा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी, भाजप पदाधिकारी, आमदार केराम उपस्थित होते; मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावले गेले नाही. यामुळे तालुकाप्रमुख जितू चोले, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांच्यासह शिवसैनिक आक्रोशले.


दरम्यान, दुपारी पाच वाजता खासदार नागेश पाटील आष्टीकर ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. त्यांनी थेट वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे यांना झापून कार्यक्रम व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली. यावेळी खासदारांनी इशारा देत सांगितले की, “ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारात रुग्ण कल्याण समिती वगळता इतर कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड सहन केली जाणार नाही. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.”


या संपूर्ण प्रकरणामुळे शिबिराचे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.



