नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाच्यावतीने नुकतीच सुरु केली आहे. या योजनेत अर्ज करताना नागरिकांना विविध प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे. ही प्रमाणपत्र, दाखले काढण्यासाठी नागरिकांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून अर्ज करुन काढून घ्यावेत. ही प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू केंद्र चालकांनी निर्धारित सेवा शुल्का व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारल्यास नागरिकांनी संबंधित तहसिलदाराकडे लेखी स्वरुपात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी अर्जदाराने राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (रहीवासी प्रमाणपत्र) तसेच उत्पनाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यत) अर्जासोबत दाखल करावयाचे आहे. वय व अधिवास प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्र (रहिवासी प्रमाणपत्र) सेवा शुल्क -34 रुपये विहित नमुन्यातील अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला, प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा, मतदान ओळखपत्र, मतदार यादीची प्रत, शिधापत्रिका, आधारकार्ड, शहरी भागातील असल्यास बील कलेक्टर, नगरसेवकाची सही व स्टॅम्प,
ग्रामीण भागातील असल्यास ग्रामसेवक, सरपंच यांची सही व स्पॅम्प, विद्युत देयक पावती, घर कर पावती, भाड्याने राहत असल्यास घरमालकाचे विद्युत देयक व भाडेपत्र, विवाहीत स्त्री असल्यास विवाहाचा दाखला, पतीचे रहीवासी दाखला. उत्पन्नाचा प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे (उत्पन्नाचा दाखला) सेवा शुल्क -34 रुपये विहित नमुन्यातील अर्ज, मतदान ओळखपत्र, मतदार यादीची प्रत, शिधापत्रिका, आधारकार्ड, विद्युत देयक पावती, घर कर पावती, भाड्याने राहत असल्यास घरमालकाचे लाईट बिल व भाडेपत्र, तलाठी अहवाल इ. प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करावेत. हे सर्व प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करण्यासाठी संबंधित तहसिलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी या योजनेअंतर्गत लागणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ
राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला मुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. सन 2024-25 या वर्षात या प्रवर्गातील परदेशी शिष्यवृत्ती योजनेत अर्ज करण्यासाठी 30 जून 2024 पर्यत आवाहन करण्यात आले होते. आता विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील मुला मुलींना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत अर्ज मागविण्यासाठी 15 जुलै 2024 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.