नांदेड| यशवंतराव चव्हाण ग्राम विकास प्रतिष्ठान करकाळा तालुका उमरी च्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या 21 व्या लोकसंवाद ग्रामीण राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी , गीतकार , लेखक प्रा. रविचंद्र हडसनकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड केल्यानंतर निवड समितीने त्यांना निवड पत्र देऊन त्यांचे निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.


यावेळी लोकसंवादचे मुख्य संयोजक जेष्ठ कथाकार दिगंबर कदम , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी , मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार, बापू दासरी, शिवा कांबळे, व्यंकटेश चौधरी,नारायण शिंदे , प्रा.महेश मोरे, राम तरटे, गोविंद जोशी, प्रा. धाराशिव शिराळे, अरुण आतनुरे, श्रीनिवास म्हस्के आदीची उपस्थिती होती.

महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात नावारूपाला आलेले साहित्य संमेलन म्हणून लोकसंवाद साहित्य संमेलनाकडे पाहिले जाते . अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनेक अध्यक्षांनी या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविलेले आहे . सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या आणि ग्रामीण जीवनाच्या वास्तवाशी निगडित असलेल्या लोकसंवाद ग्रामीण राज्यस्तरीय साहित्य संमेलनाने नांदेड जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात साहित्य , जनजीवन आणि ग्रामीण मातीशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे लोकसंवाद साहित्य संमेलनाला मोठी उंची प्राप्त झालेली आहे .


गेल्या वीस वर्षापासून शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय संयोजक दिगंबर कदम हे लोकसंवाद साहित्य संमेलन घेत असतात . या साहित्य संमेलनातून अनेक नवोदितनाही त्यांनी मोठी संधी दिली आहे. त्यामुळे लोकसंवाद साहित्य संमेलनाकडे साहित्यिकांसह साहित्य प्रेमींचाही ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर्षी हे 21 वे साहित्य संमेलन असून निवड समितीने 21 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी , गीतकार , लेखक प्रा. रविचंद्र हडसनकर यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल हाडसनकर यांचे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांकडून अभिनंदन.


