नांदेड| केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ‘शंखनाद’ सभेसाठी भारतीय जनता पक्षाची तयारी पूर्ण झाली असून, जिल्ह्यात सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येते आहे. जिल्ह्यातील सर्वच नेते सभेसाठी जोरदार तयारीला लागले आहेत, तर ही सभा भव्य करण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला आहे.


केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्याध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण आदी प्रमुख नेतेमंडळी सुद्धा नांदेड शहरात येणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे रविवारी नांदेड शहरात डेरेदाखल झाले असून, दुपारी त्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्यासमवेत सभास्थळासह दौऱ्यातील इतर कार्यक्रम स्थळांची पाहणी केली.


याप्रसंगी खा.डॉ. अजित गोपछडे, संघटन मंत्री संजय कौडगे,नांदेड महानगर भाजपचे अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, किशोर स्वामी, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले,रामराव केंद्रे,बालाजी जाधव,व्यंकटेश साठे आदी उपस्थित होते. पाहणी झाल्यानंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना खा. अशोकराव चव्हाण यांनी सभेची तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले, तर या सभेमुळे जिल्ह्यातील भाजपाची परिस्थिती अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.




