भोकर/नांदेड|“माझी पत्नी मरणाच्या दारात आहे… मी तिला वाचवण्यासाठी तुमच्या दारात आलोय, मला पैसे द्या साहेब!” अशी विनंती करत एक वृद्ध पोस्ट ऑफिस समोर रडू लागला, आणि क्षणभरात भोकर पोस्ट ऑफिसात मानवतेचा एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला.


मिळालेल्या माहितीनुसार, मु. रायखोड (ता. भोकर) येथील ७२ वर्षीय विठाबाई मारुती मोरे या महिला गंभीर आजारी होत्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांच्याकडील पैसे संपल्याने रुग्णालयाने उपचार थांबवले. विठाबाई मोरे यांनी दोन वर्षांपूर्वी “महिला सन्मान योजना” या योजनेअंतर्गत भोकर पोस्ट ऑफिसमध्ये बचत केली होती.


उपचारासाठी हे पैसे काढण्याच्या उद्देशाने त्यांचे पती मारुती मोरे यांनी थेट नांदेडवरून अत्याधुनिक रुग्णवाहिका घेऊन भोकर पोस्ट ऑफिसात हजेरी लावली.


पोस्ट मास्तर एस. नलावाड आणि डाक सहाय्यक स्नेहकांता गायकवाड यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून विलंब न करता तत्काळ पोस्ट ऑफिसबाहेरील रुग्णवाहिकेमध्ये जाऊन आवश्यक कार्यवाही केली आणि विठाबाई मोरे यांच्या खात्यातील रक्कम त्यांच्या पतीला दिली.


यानंतर विठाबाई यांच्या पतींनी डाक कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले आणि तातडीने पत्नीला उपचारासाठी नांदेडकडे रवाना झाले. या प्रसंगी डाक सहाय्यक कैलास पाटील, विजयकुमार कदम, शैलेश चक्ररवार तसेच रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते. डाक कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि मानवतेच्या भावनेमुळे डाक विभागाच्या सेवाभावाला खरी “मानवी” ओळख मिळाली, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.


