नांदेड l दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्याचा एक संस्कार कवी देवीदास फुलारी यांच्या व्यक्तिमत्वावर झालेला आहे. लेखक म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी राहिले आहे. कविता , समीक्षा, कादंबरी, बाल साहित्य इत्यादी प्रकारात त्यांनी लेखन केले असले तरीही कविता हा त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय होय. त्यांच्या प्रत्येक पुस्तकागणिक प्रगती तर होत गेलीच शिवाय भाषेचे सौंदर्य ही वृद्धिंगत होत गेले. कवितेबरोबर इतर साहित्य प्रकारातही फुलारी यांनी निर्मितीच्या वाटा सकस केल्या आहेत असे प्रतिपादन कवयित्री डॉ वृषाली किन्हाळकर यांनी केले.


नांदेडच्या ललित कला प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या “देवीदास फुलारी एक सन्मान सोहळा” या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संजीव कुलकर्णी हे होते. यावेळी मंचावर देवीदास फुलारी सह डॉ. वृषाली किन्हाळकर, शंतनू डोईफोडे ,दिगंबर कदम यांची विशेष उपस्थिती होती.


प्रारंभी प्रिया प्रद्युम्न गुरव यांनी गुरुस्तवन केले. कवी वेंकटेश चौधरी यांनी प्रास्ताविक केल्यानंतर ललित कला प्रतिष्ठानच्या वतीने गजानन मुधोळ पाटील, प्रा महेश मोरे राम तरटे सह सर्व मान्यवरांनी सौ. मंगल फुलारी आणि देवीदास फुलारी यांचा हृदय सत्कार केला. नंतर प्रा. धाराशिव शिराळे यांनी फुलारीना काव्यात्मक मानपत्र अर्पण केले. डॉ वृषाली किन्हाळकर यांनी देवीदास फुलारी यांच्या साहित्याचा थोडक्यात मागोवा घेतला. अध्यक्षीय समारोप करताना संजीव कुलकर्णी म्हणाले, देवीदास फुलारी हे माझे तीन तपापासून मित्र आहेत. त्यांच्याशी वाद झाले, संघर्ष झाला पण आमच्या मैत्रीत काही फरक पडला नाही. अंतकरणात काडीचीही कटुता न ठेवणारा हा कवी आहे.


यावेळी संपादक शंतनू डोईफोडे म्हणाले की, मागील तीन दशकापासून अत्यंत निष्ठेने देवीदास फुलारी हे वांग्मयीन चळवळीत काम करत आहेत. हे काम करताना त्यांनी आपल्या लेखनाकडे पण दुर्लक्ष होऊ दिले नाही. नवोदितांसाठी ते खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरले आहेत.

सत्काराला उत्तर देताना देवीदास फुलारी यांनी आपल्या जीवन प्रवासात ज्यांनी ज्यांनी सर्वार्थाने सहकार्य केले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रकाश मोगले म्हणाले , देवीदास फुलारी हे साहित्य चळवळीत अत्यंत निष्ठेने काम करतात आणि साहित्य चळवळीत काम करणाऱ्यांनी तुकारामाची गाथा बुडवणाऱ्या प्रवृत्तीला ओळखले पाहिजे.
अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी याज्ञसेनी हे मिथक कादंबरीत आणताना आजची आधुनिक स्त्री देवीदास फुलारी यांनी डोळ्यासमोर ठेवली आहे असे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना कथाकार दिगंबर कदम म्हणाले नांदेडच्या साहित्य परिषदेला देवीदास फुलारी यांनी नवा आयाम दिला असून साहित्य परिषदेला त्यांनी समाजाभिमुख केले आहे .सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत देवीदास फुलारी यांचे योगदान मी जवळून बघितलेले आहे.
कवी श्रीनिवास मस्के म्हणाले आज जो काही मी कवी म्हणून उभा आहे त्याच्या मुळाशी गुरुवर्य देवीदास फुलारी यांची प्रेरणा आहे. या सन्मान सोहळ्यात शंकर वाडेवाले ,बापू दासरी, विठ्ठल पावडे कॉ. प्रकाश जैन , श्रीनिवास मस्के आदीनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचं सुरेख सूत्रसंचालन कथाकार राम तरटे यांनी केले तर आभार डॉ प्राची पाटील यांनी मानले. या कार्यक्रमात प्रा नारायण शिंदे , डॉ. राम जाधव, डॉ. संजय जगताप, जयंत वाकोडकर, दि मा देशमुख, विजय होकर्णे , उमाकांत जोशी, लालू कोंडलवाडे, बंडोपंत कुंटूरकर नागोराव डोंगरे , प्रज्ञाधर ढवळे रोहिणी पांडे, रुचिरा बेटकर डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, डॉ. ललिता शिंदे, हिमांशू गोरठेकर, डॉ. व्यंकटी पावडे , डॉ. योगिनी पांडे सातारकर,ललिता शिंदे , पृथ्वीराज तौर , स्वाती कान्हेगावकर , अंजली मुनेश्वर, अमृत तेलंग , शंकर राठोड सह अनेक साहित्यिक रसिक शिक्षक उपस्थित होते.


