नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी ६ वाजता डॉ. शंकरराव चव्हाण पुतळ्यासमोर तिरंगा ध्वजाच्या खाली खुल्या मंचावर आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण तिरंगामय झाले होते. एकाहून एक काळजाला भिडणार्या देशभक्तीच्या गीतांनी उपस्थित भारावले. डॉ. दिलीप शिंदे व सहकार्यांच्या संकल्पनेतून नांदेड शहरातील खुल्या मंचावर देशभक्ती गीतांचा हा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. या आगळ्यावेगळ्या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमास नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार राम तरटे, सतीश जैन, दिनकर जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. वायु दलातील निवृत्त सार्जंट स्व. सुरेंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ खुल्या मंचावर आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात नांदेडचे गायक विजय निलंगेकर, विजय जोशी, बालचंद यादव, मंजूर हाश्मी, सचिन कांबळे, शेख सलीम, लक्ष्मीकांत कुलकर्णी, रमेश मेगदे, कु.सायली मुधोळकर, मीरा वच्चेवार, ललिता डुलगच, मोहम्मद जमाल आणि संयोजक डॉ.दिलीप शिंदे, अनुराधा पांडे यांनी राष्ट्रभक्तीवर आधारित अनेक रचना ठेवल्या. जलवा तेरा जलवा, तोबा मेरी तोबा, मेरे देश की धरती, मेरे देश मे पवन चले पुरवाइ, ए जाते हुए लम्हो, कर चले हम फिदा यासह अनेक देशभक्तीपर गीतं सादर करून गायकांनी दाद मिळवली. सायंकाळच्या सोनेरी वातावरणात तिरंगा ध्वजाच्या खाली साकारलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने वातावरणही देशभक्तीमय झाले होते.

ना भव्यदिव्य स्टेज, ना प्रेक्षकांसाठी खास आसन व्यवस्था, ना कलाकारांसाठी कोणत्याही प्रकारचे मानधन तरीही उत्साह, गायकांचा जोश आणि राष्ट्रभक्तीमय वातावरणात पार पडलेला हा सुर संगीताचा सोहळा रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होता. या मार्गावरून जाणारे येणारे प्रत्येक नागरिक, वाटसरू आणि वाहन चालकही थांबून या राष्ट्रभक्तीपर गीतांचा आनंद लुटत होते. मेट्रो सिटीच्या धर्तीवर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम दरवर्षी असाच सुरू असावा.


यासाठी लागेल ती मदत करू, असा विश्वास ज्येष्ठ संपादक शंतनु डोईफोडे आणि ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी अगदी उद्घाटनाच्या सुरुवातीलाच दिला. नांदेडकरांच्या उदंड प्रतिसादात आयोजित करण्यात आलेल्या या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाने वातावरणातच राष्ट्रभक्तीचे नवचैतन्य निर्माण झाले होते. सुमेहा हॉस्पीटलचे डॉ. अनिल पाटील, डॉ. सौ. सुजाता पाटील, सुनील पाटील यांचे सहकार्य लाभले.


