हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ उमरखेड – आणि मराठवाडयाच्या नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी दोन दिवसापासून सतत चालू असलेल्या अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहेत. बोरीच्या पुलाला लागून पाणी वाहत असून, गंजेगाव पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे कालपासून विदर्भ – मराठवाडयांचा संपर्क तुटल्याने दळणवळन वाहतुक ठप्प झाली आहे. हिमायतनगर पळसपुर मार्ग ढाणकी मधील पैनगंगा नदीवर असलेल्या गांजेगाव पुलावर पावसाळ्यात नेहमीच पाणी येत असल्याने या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नदीकाठचे नागरिक करत आहेत.
मागील अनेक वर्षांपासून खरीप हंगामात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहातात. त्यातच पैनगंगा नदीत ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यात येते तर कयाधू नदीचा पुरही पैनगंगेत येऊन मिसळत आसल्यामुळे नदीला महापूर येतो. यंदा मात्र पावसाळ्यात पहिल्यांदाच दोन दिवसात झालेल्या पुराच्या पाण्याने गावानजीक नाले, नदी तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे नदी काठच्या हजारो हेक्टर शेतात शिरून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दि.३१ च्या रात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. त्यातच रविवारी सकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे विदर्भ – मराठवाड्याला जोडणारा गांजेगाव येथील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने कालपासून गांजेगाव बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने दळणवळनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे येथील बंधाऱ्यावरून पाणी कमी होत नाही तोपर्यंत दळणवळणासाठी नागरिकांना ३० ते ३५ किमि. दूरचा प्रवास म्हणजे बोरी मार्गाच्या पुलावरून आपले गाव गाठावे लागनार आहे.
मात्र बोरी येथील दुसऱ्या पुलाचे काम अर्धवट आहे, तर आज सकाळी ७ वाजता जुन्या पुलाला लागून पाणी वाहू लागल्याने वरील पातळीवर असाच पाऊस सुरु राहिला तर या पुलावरून देखील पाणी वाहून हा मार्ग देखील बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच या पुराच्या पाण्याने नदीकाठच्या अनेक गावांना वेढा घातला असून, यामुळे छोटे नाले भरून वाहत असल्याने अनेक गावाचा हिमायतनगर शहरांशी संपर्क तुटला आहे. या बाबीकडे प्रशानने लक्ष देऊन गांजेगाव पूल आणि बोरच्या पुलावर कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
गांजेगाव येथील पुलंच्या उंची संदर्भात नांदेड न्यूज लाइव्हने गत १० वर्षापासून सतत बातम्या प्रकाशित केल्या आहेत. जर हा पूल उंच करण्यात आला तर मराठवाड्यातून विदर्भात जाण्यासाठीचे अंतर या पुलामुळे कमी होऊन वारंवार पावसाळ्यात मार्ग बंद होण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळणार आहे. मात्र याकडे आत्तापर्यंतच्या एकही खासदारांनी व पैनगंगा प्रकल्पच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने नदीकाठच्या गावकऱ्यासह विदर्भ – मराठवाड्यात कमी वेळात ये-जा करणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात संपर्क तुटण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो आहे. किमान शिंदे सरकारच्या काळात तरी गांजेगाव पूल उभारून पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी मागणी ढाणकी, गांजेगाव, पळसपूर, सावळेश्वर, डोल्हारी, सिरपल्लीसह उमरखेड/ हिमायतनगर तालुक्याच्या दोन्ही भागातील गावकऱ्यानी केली आहे.
हा मार्ग म्हणजे विदर्भ- मराठवाडा- तेलंगणा – आंध्रप्रदेश – कर्नाटकला जोडलेला आहे. हा रस्ता ये-जा करणाऱ्या धार्मिक दिंड्यां मार्गक्रमणाचा असून, तीर्थक्षेत्र माहूर, बासर, पोहरा देवी येथे भक्तांची आवक – जावक होते. तसेच विदर्भातील नागरिकांना अल्प खर्चातून रेल्वे प्रवास करण्यासाठी जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ राहत असल्याने या मार्गात अडसर ठरलेला पैनगंगा नदीवरील गांजेगावचा पुलाची उंची वाढऊन नव्याने बांधणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हा पूल कम बंधारा झाला तर वरील भागात पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांना साठून राहणाऱ्या पाण्याचा देखील नक्कीच फायदा होणार आहे. पावसाळ्यात विदर्भ – मराठवाड्याचा संपर्क तुटण्याचे प्रकार थांबतील व दळणवळणातील अडथळे दूर होऊन, समोरील गावांना होणाऱ्या पुराचा धोका टळून गावकरी चिंतामुक्त होतील. दोन्ही विभागातील अनेक गावांना याचा फायदा होईल अशी रास्ता अपेक्षा या भागातील जनतेची आहे.