नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व प्रकारच्या मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.


महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम १९४९ चे कलम १४२ (१) तसेच महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, मद्यविक्री नोंदवही इ.) नियम १९६९ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून नांदेड जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री करणाऱ्या एफएल-१, एफएल-२, एफएल-३, एफएल-४, एफएलबीआर-२, सीएल-२, सीएल-३ व ताडी अनुज्ञप्त्या पुढील प्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत बुधवार, दि. १४ जानेवारी २०२६ (मतदानाच्या आदल्या दिवशी) सकाळी ६ वाजेपासून संपूर्ण दिवस, गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ (मतदानाचा दिवस) संपूर्ण दिवस, शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ (मतमोजणीचा दिवस) मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्य विक्री पूर्णतः बंद राहणार आहे.


सदर कालावधीत संबंधित सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्या लागणार असून, याबाबत कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम १९४९ व त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेसाठी गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (क) अन्वये मतदानाच्या आधीचा दिवस, मतदानाचा दिवस व मतमोजणीचा दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

