
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दल (RPF) व सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांनी संयुक्तपणे राबवलेल्या ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ आणि ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रभावी कारवाई करत चोरीच्या प्रयत्नातील आरोपींना ताब्यात घेतले असून, बेवारस मोबाईलही मालकाला परत देण्यात आला आहे.


२ एप्रिल २०२६ रोजी परभणी रेल्वे स्थानकावर CIB/नांदेडचे एएसआय अमोल वावळे यांनी GRP परभणीच्या पथकासह विशेष तपासणी मोहीम राबवली. या दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील ओव्हरब्रिजजवळ प्रवाशांच्या मालमत्तेची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयितांना रंगेहात पकडण्यात आले.

सुमारे सायं. ७.३० वाजता गाडी क्रमांक १७६१४ (पनवेल एक्सप्रेस) थांबलेली असताना परभणी जिल्ह्यातील अरविंद यास चोरीच्या प्रयत्नात ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर रात्री ९.१५ वाजता गाडी क्रमांक १७६८७ (मराठवाडा एक्सप्रेस) येथे नांदेड जिल्ह्यातील प्रेम यालाही चोरीच्या प्रयत्नात पकडण्यात आले. दोन्ही आरोपींना GRP परभणी यांच्या ताब्यात देऊन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



तसेच रात्री सुमारे १० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील बुकिंग काउंटरजवळ पाकिटमारी करण्याच्या तयारीत असलेला नांदेड जिल्ह्यातील राहुल यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध GRP परभणी यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११० व ११७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत त्याच पथकाला प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील रेल्वे कँटीनजवळ सुमारे १५ हजार रुपये किंमतीचा विवो मोबाईल बेवारस अवस्थेत आढळून आला. घोषणा करून व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा मोबाईल परभणी येथील गणेश यांना परत देण्यात आला.
याशिवाय ३ एप्रिल रोजी पहाटे ४.५० वाजता CIB-D&I/नांदेड, RPF/छत्रपती संभाजीनगर व GRP यांच्या संयुक्त कारवाईत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाल करणाऱ्या आकाश यास ताब्यात घेण्यात आले. तो गाडी क्रमांक १७०५७ (देवगिरी एक्सप्रेस) थांबलेली असताना चोरीच्या उद्देशाने फिरताना आढळला. त्याच्या विरुद्ध BNS कलम १२८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईमुळे रेल्वे परिसरात RPF व GRP सतत सतर्क असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रभावी पावले उचलली जात असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. प्रवाशांनीही सतर्क राहून संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना किंवा सुरक्षा हेल्पलाईन १३९ / १८२ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



